झाम्बियात पुरातत्वतज्ञांना यश
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आजही माणसांच्या नजरेपासून दूर आहेत. या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. हजारो किंवा लाखो वर्षांपूर्वीच्या संस्कृती नष्ट झाल्या आहेत. अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे हे घडले आहे. आता संशोधक उत्खनन करून या संस्कृतींचा शोध घेत आहेत. अनेक जुन्या संस्कृतींचा शोध अशाचप्रकारे लागला आहे. काही पुरातत्वतज्ञांनी झाम्बियामध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या 5 लाख वर्षांपूर्वी वापरण्यात आलेल्या फर्निचरची छायाचित्रे शेअर केली आहेत. या फर्निचरला आतापर्यंतच्या कारपेंट्रीच्या सर्वात जुन्या डिझाइनपैकी एक मानले जात आहे.
झाम्बियाच्या कलम्बो फॉल्समध्ये मिळालेल्या लाकडाच्या या तुकड्याला आतापर्यंतचे सर्वात जुने फर्निचर मानले जात आहे. यात लाकडाच्या दोन तुकड्यांना कापून इंटरलॉक करण्यात आले होते. या फर्निचरच्या खालच्या हिस्स्यात चिन्हं कोरण्यात आली आहेत. हे सर्वात जुने वुड कंन्स्ट्रक्शन असू शकते असे नेचर या नियतकालिकात प्रकाशित अहवालात म्हटले गेले आहे. हे लाकूड अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलचे प्राध्यापक लार्री बरहम यांच्यानुसार हा तुकडा अनेक मिथकांना चुकीचा ठरवत आहे. लाकडाचा वापर लाखो वर्षांपासून केला जात असल्याचे या शोधामुळे स्पष्ट होते.