ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचे संकट या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीसंदर्भात नियमावली जारी केली आहे.
गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये अंडर सेपेटरी स्तरापासून कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित केली आहे. उर्वरित 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचसोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळय़ा शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच दिव्यांग, गर्भवती महिलांना वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. ज्या कर्मचाऱयाचे घर कन्टेंन्मेंट झोनमध्ये असेल तर त्याला ऑफिसमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी 9 ते 5.30 आणि सकाळी 10 ते 6.30 या दोन वेळेत काम करतील. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका आयोजित करण्यात येतील. केंद सरकारच्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने हे आदेश जारी केले आहेत.