प्रतिनिधी / बेळगाव
हट्टीहोळ गल्ली शहापुरातील माई हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱयांवर हल्ला केल्याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकामध्ये 50 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिलिंद हलगेकर यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी हे गुन्हे नोंदविले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे म्हणत माई हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी प्रमोद सतीश बेकवाड, प्रसाद वैजू बेकवाड, शुभम बेकनाळकर आणि प्रतीक धारवाडकर यांच्यासह इतर 50 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर येथील डॉक्टर-कर्मचाऱयांना धक्काबुकी व मारहाण करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.