वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी दिलासा
प्रतिनिधी / बेळगाव
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. अनेकजण वेळेत दंडाची भरणा करीत नाहीत. अशा वाहनचालकांना दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे. एकाचवेळी दंड भरणाऱ्यांसाठी सरकारने 50 टक्के सूट दिली आहे.
बेलट्रॅक योजनेंतर्गत संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची छबी या कॅमेऱ्यातून कैद होते. संबंधितांना दंड भरण्यासंबंधी घरपोच नोटिसा पाठविल्या जातात. नोटिसा पाठवूनही अनेकजण दंडाची रक्कम भरत नाहीत, असे आढळून आले आहे.
11 फेब्रुवारी रोजी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियम मोडलेल्या वाहनचालकांना दंड भरण्यासंबंधी नोटिसा पाठविल्या जात आहेत. वाहतूक पोलीस स्थानकातून फोनवरूनही संपर्क साधण्यात येत आहे. नागरिकांनी लोकअदालतीच्या आत दंड भरण्याचे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानक व बेळगाव वन सेंटरमधूनही दंडाची रक्कम भरता येते. सरकारी वेबसाईटवरही दंड भरता येतो. नियम मोडलेल्या वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. यासंबंधी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता 11 फेब्रुवारीच्या आत ई-चलन संबंधी दंड भरणाऱ्यांसाठी सरकारने 50 टक्के सूट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.