भारताच्या आर्थिक प्रगतीत सरकारी कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘रोजगार मेळा पुढाकार’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 51 हजार नवनियुक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. हे कर्मचारी केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील पदांवर नियुक्त करण्यात आले आहेत. भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
भारताला 2047 पर्यंत महासत्ता बनविण्याचे आमचे ध्येय आणि धोरण आहे. तसा निर्धारच आम्ही केला आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्याची विशिष्ट भूमिका असून सर्व कर्मचाऱ्यांनी जीव ओतून काम करण्याची आवश्यकता आहे. नव्या कर्मचाऱ्यांची पिढी ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जन्मलेली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या कामांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे. ‘नागरीकांच्या हिताला प्राधान्य’ या तत्वानुसार आपल्याला काम करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या कार्यकक्षेत जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचा पुरेपूर उपयोग आपण करावा, अशी सूचना त्यांनी केली.
दृष्टीसमोर भव्य ध्येये
केंद्रात भारतीय जनता पक्ष आणि रालोआचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यापासून देशाच्या सर्वांगिण विकासाची मोठे ध्येये आम्ही दृष्टीसमोर ठेवून गेली 9 वर्षे काम केले आहे. धोरणे ठरविताना आम्ही नवी मानसिकता आचारणात आणली. जनसहभाग, योजनांचे निष्ठापूर्वक क्रियान्वयन आणि कार्यतत्परता या तीन तत्वांच्या आधारावर आम्ही काम करीत आहोत. यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये अनेक योजना आणि प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्यात आले. संसदेत संमत करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक हे आमच्या ठाम निर्णयशक्तीचे द्योतक आहे. देशाचे नवे भवितव्य आता नव्या संसदेत निर्धारित होणार असून सारा देश याचा साक्षीदार होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
रांगा लावण्याची समस्या सुटली
काही वर्षांपूर्वी रेल्वे तिकिटे, लांबच्या प्रवासाची बस तिकिटे इत्यादी खरेदी करण्यासाठी अनेक तास रांगेत उभे रहावे लागत असे. त्यामुळे सर्वसामान्यांचा बहुमूल्य वेळ विनाकारण वाया जात असे. आज आम्ही देशात केलेल्या डिजिटल क्रांतीमुळे ही समस्या सुटली आहे. लोक आता आपल्या घरातून संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून ही कामे करु शकतात. आधार कार्ड, डिजिटल लॉकर्स आणि ई-केवायसी यांच्या माध्यमातून कागदपत्रे तयार होत असल्याने या कामातील जटीलता नाहीशी झाली आहे, अशी भलावण त्यांनी केली.
जागतिक अडचणी असूनही…
सगळे जगच आज आर्थिक अडचणींना तोंड देत असूनही भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक गतीने वाढताना आपण पहात आहोत. उत्पादन आणि निर्यात यांच्यातही मोठी वाढ झाली आहे. सरकार आज आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्माण कार्यावर जो खर्च करीत आहे, तो आजवर कधीही नव्हता इतका आहे. प्रकल्पांच्या क्रियान्वयनाचा वेगही आजवर कधी नव्हता, इतका आज अधिक आहे. हे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने घडत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा
ड देशाच्या प्रगतीत आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य
ड महिला आरक्षण विधेयक सामाजिक सबलीकरणाचे महत्त्वाचे द्योतक
ड रोजगार मेळा पुढाकार कार्यक्रमातून आतापर्यंत 3 लाख नोकऱ्या
ड आणखी 7 लाख केंद्रीय नोकऱ्या येत्या काही महिन्यांमध्ये देणार