उद्योग खात्याकडून 78 योजनांना मंजुरी ः राज्यस्तरीय एक खिडकी समिताया बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात भांडवल गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग खात्याने 78 योजनांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी 5298.69 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
बेंगळूरमधील कर्नाटक उद्योग मित्र कार्यालयात अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या 138 व्या राज्यस्तरीय एक खिडकी (सिंगल विंडो) समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एकूण 78 योजनांमधून 5298.69 कोटी रु. भांडवल गुंतवणूक होणार असून 13,917 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमध्ये 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या 17 प्रमुख अवजड आणि मध्यम योजनांचा समावेश आहे. यात 3552.66 कोटी रु. भांडवल गुंतवणूक होणार असून 6,933 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंगल विंडोज समितीच्या बैठकीत 15 कोटी रु. ते 50 कोटी रुपयापर्यंतच्या 59 नव्या योजनांनाहिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यामुळे एकूण 1542.88 कोटी रुपये भांडवल गुंतवणूक होणार असून अंदाजे 6,984 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त भांडवली गुंतवणूक योजनांना देखील सिंगल विंडो समितीने मंजुरी दिली असून 203.15 कोटी रुपये गुंतवणूक होईल.बैठकीत वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मुख्य सचिव डॉ. एस. सेल्वकुमार, औद्योगिक विकास आयुक्त गुंजन कृष्णा, केआयएडीबीचे सीईओ आर. गिरीश, कर्नाटक उद्योग मित्रचे व्यवस्थापकीय संचालक मित्र गंगाधरय्या तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.