इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या उच्छृंखल जीवनशैलीबद्दल जगभरात प्रसिद्ध आहेत. अनेक स्त्रियांशी शारीरिक संबंध हे त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे व्यवच्छेदक लक्षण राहिले असून याबद्दल ते अनेकदा कमालीचे वादग्रस्त ठरले आहेत. त्यांचा आर्थिक भ्रष्टाचार, करचुकवेगिरी, चैन, ऐषोआराम इत्यादी बाबी जगभरात चर्चेचा विषय झालेले आहेत. यातच आता आणखी एका बाबीची भर पडणार असल्याचे बोलले जाते. बर्लुस्कोनी यांच्यापेक्षा 53 वर्षांनी लहान असलेल्या एका युवतीशी विवाहबद्ध झाले आहेत.
या युवतीची अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, एका पार्टीत तिचा बर्लुस्कोनी यांच्याशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर एक वर्षातच विवाहामध्ये झाले, असे सांगण्यात येत आहे. बर्लुस्कोनी यांचे वय सध्या 85 वर्षांचे आहे तर त्यांची वधू अवघी 32 वर्षांची आहे. या वधूचाही हा तिसरा विवाह असल्याचे सांगितले जाते. बर्लुस्कोनी हे दुसऱया महायुद्धानंतरचे इटलीचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. पंतप्रधान असतानाही त्यांच्या वर्तणुकीला कोणताही धरबंद नव्हता. त्यामुळे ते सातत्याने विरोधी पक्षांचे लक्ष्य बनत असत. त्यांच्या बुंगा बुंगा पार्टीज बहुचर्चित होत्या. अल्पवयीन मुलींशी शरीरसंबंध ठेवण्याचे आरोपही त्यांच्यावर झाले आहेत. अशा एका नेत्याचा असा विवाह चर्चेचा विषय झाला नसता तरच नवल होते. बर्लुस्कोनी मात्र ‘ऐकावे जगाचे, करावे मनाचे’ या भावनेने वयाच्या 85 व्या वषीही आपली उन्मुक्त जीवनशैली उपभोगत आहेत.