पॅरालिम्पिक व रोईंग फेरडेशन्सकडे मंत्रालयाचे पुन्हा दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी देशातील 54 राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सना या वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत मान्यता दिली आहे. मात्र यातून पॅरालिम्पिक व रोईंग फेडरेशन्सना वगळण्यात आले आहे.
मंत्रालयाने अखिल भारतीय कॅरम फेडरेशनला नव्याने मान्यता दिली आहे. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीएल), रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया (आरएफआय), स्कूल गेम्स फेरडेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) यांना मात्र पुन्हा एकदा मान्यता नाकारण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे पीसीआय व आरएफआय यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे तर सुशील कुमारच्या नेतृत्वाखालील एसजीएफआयची गैरव्यवस्थापनाच्या कारणास्तव मान्यता काढून घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सना मंत्रालयाकडून दरवेळी एका वर्षाची मान्यता देण्यात येते. मात्र यावेळी सप्टेंबरपर्यंतच मान्यता देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘सप्टेंबरपर्यंतच का, डिसेंबर 2020 पर्यंत का मान्यता दिली नाही,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात क्रीडा मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले होते. पण मंत्रालयाच्या पदाधिकाऱयांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. देशातील लहान राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सला केंद्राची मान्यता मिळणे फार महत्त्वाचे असून मंत्रालयाकडून मिळालेल्या निधीवरच फेडरेशन्सना सर्व खर्च भागवावा लागतो.