पुढील वर्षी जूनमध्ये विंडीज व अमेरिकेत होणार आयोजन : आयसीसीकडून तारखाही जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तारखांची घोषणा केली आहे. यासोबतच अमेरिका व वेस्ट इंडीज या दोन्ही सहयजमान देशातील तब्बल दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. स्पर्धेची सुरुवात 4 जून रोजी होऊन अंतिम सामना 20 जून रोजी पार पडणार आहे.
शुक्रवारी आयसीसीने जोहान्सबर्ग येथे झालेल्या आपल्या बैठकीनंतर या विश्वचषकासाठी तारखांचे तसेच ठिकाणांच्या नावांची घोषणा केली. दोन दिवसापूर्वी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्थळांची घोषणा केली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिजमधील सात शहरांची नावे जाहीर केली गेली आहे. वेस्ट इंडीजमधील अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डोमिनिका, गयाना, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स या शहरांमध्ये तर अमेरिकेतील सामने फ्लोरिडा, न्यूयॉर्क व डॅलस येथे खेळवले जातील. डॅलसमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी ही मैदाने या विश्वचषकासाठी निवडली गेली आहेत. स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार असून एकूण 55 सामने खेळवले जाणार असल्याचे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
विंडीज तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार
स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा करताना, आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, आम्ही कॅरेबियन स्थळांची घोषणा करताना आनंदित आहोत, जे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करतील आणि 20 संघ या स्पर्धेत भाग घेतील. विशेष म्हणजे, विंडीजला तिसऱ्यांदा आयसीसीच्या मोठ्या विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी त्यांनी 2007 वनडे विश्वचषक व 2010 टी-20 विश्वचषक आयोजित केला होता. दुसरीकडे, अमेरिकेत सध्या क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.
हे संघ दिसणार विश्वचषक स्पर्धेत
वेस्ट इंडिज आणि अमेरिका याआधीच यजमान म्हणून 2024 च्या टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. याशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. तर उर्वरित पाच संघ पुढील वर्षी एप्रिलअखेरपर्यंत पात्र ठरणार आहेत.