सातारा पालिकेच्यावतीने जय्यत तयार; 100 टनाची क्रेन; विसर्जन तळय़ावर लाईफ गार्डची नियुक्ती; ठिकठिकाणी सीसीटीव्हीचा वॉच
सातारा प्रतिनिधी
गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा मुख्य दिवस अनंत चतुर्थीला असून त्याच अनुषंगाने जिह्यात सर्वच ठिकाणी विसर्जनाची तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. गुरुवारी सातारा शहरातील सुमारे 30 गणेशोत्सव मंडळांनी व जिह्यातील 573 गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांची वाजतगाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. सातारा पालिकेच्यावतीने शहरात विसर्जन ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्य विसर्जन तळय़ाच्या ठिकाणी 100 टनी क्रेन, सीसीटीव्ही व प्रखर प्रकाशझोत असलेले 45 दिवे लावण्यात आलेले आहेत. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.
यावर्षी गणशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा करण्यात आला असून गणेश विसर्जनास प्रारंभ झालेला आहे. शेवटच्या दिवसापूर्वीच सातारा जिह्यातील 573 गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्यात मिरवणूका काढून आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. दरम्यान, सातारा शहरातील सुमारे 30 मंडळांच्या सातारा शहरातून सायंकाळी उशीरा विसर्जन मिरवणूका गुरुवारी काढण्यात आलेल्या होत्या. त्यांनी बुधवारा नाका येथील मुख्य विसर्जन तळय़ावर आपल्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. जिह्यात अशीच विसर्जनाची धामधुम पहायला मिळत होती. जिह्यातील 573 गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालिकेच्यावतीने जय्यत तयारी
सातारा पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी जय्यत तयारी केली असून बुधवार नाका येथील कृत्रिम तळे केलेले आहे. हे तळे 25 मीटर बाय 50 मीटरचे आहे. त्याची खोली 40 फूट, 33 फूट पाणी आहे. चारी बाजूने बॅरिकेटींग करण्यात आले आहे. अंतर्गत मुरुमीकरण करण्यात आलेले आहे. मोठया गणपतींसाठी दोन मोठे स्टेज करण्यात आले आहे. तिसरे स्टेज छोटय़ा गणपतींसाठी करण्यात आले आहे. 100 टनाचा क्रेन मूर्ती उचलण्यासाठी तयार आहे तर 25 टनाची क्रेन ठेवण्यात आली आहे. तसेच मूर्ती आतमध्ये घेवून जाण्यासाठी लाकडी पाटावर 20 कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. याच तळय़ाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रखर प्रकाशझोत असलेले 45 दिवे लावण्यात आलेले आहेत. तसेच नगरपालिकेच्या पोहण्याचा तलाव येथे 10 कर्मचारी, हुतात्मा स्मारक येथे 10 कर्मचारी, कल्याणी शाळा येथे 10 कर्मचारी, दगडी शाळा येथे 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्या कर्मचाऱयांना लाईफ जॅकेट देण्यात आलेले आहेत. दरम्यान, सीसीटीव्हीचा वॉच ठेवला असून पोलिसांचीही करडी नजर राहणार आहे.
वाहतूकीत बदल
गणेश विसर्जनच्या अनुषंगाने सातारा शहरात वाहतूकीत बदल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली. राजपथावर कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक, मोती चौकपर्यंत येणाऱयाजाणाऱया सर्व वाहनांना बंदी आहे. कमानी हौद व शेटय़े चौकापर्यंत येणाऱया जाणाऱया सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटय़े चौक ते शनिवार चौकमार्गे मोती चौकपर्यंत येणाऱया जाणाऱया वाहनांना प्रवेश बंद, मोती चौक, एमएसईबी ऑफीस, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका चौक, गणेश विसर्जन कृत्रिम तलाव, कै. किसन आंदेकर चौक, करंजे हा रस्ता सर्व वाहनांना बंद राहिल, स्टेट बँक प्रतापगंज पेठ, डीसीसी बँक मोती तळेपर्यंत येणारे जाणाऱया सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल. तर समर्थ मंदिर ते चाँदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहिल. बोगदा ते शाहु चौक हा मार्ग जड वाहनांसाठी बंद राहिल. सज्जनगड, कासकडे जाणारी येणारी वहने बोगदा मार्गे जातील येतील. मोळाचा ओढय़ाकडून शहरात येणारी वाहने भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर, राधिका टॉकीज चौक, एसटी स्टॅण्डकडे येणारी वाहने कोटेश्वर मंदिर, शाहुपूरी मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक मार्गे स्टॅण्डकडे येतील, मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहु चौक, अदालतवाडा मार्गे समर्थ मंदिरकडे मार्गस्थ होतील. शेटय़े चौक शनिवार चौक, जुना मोटरस्टॅण्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने तेथील रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेवून जावे. पार्किंगची व्यवस्था तालिम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या ठिकाणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.