5.2 अब्ज डॉलर्सचा असणार प्रकल्प : संरक्षण मंत्री भारताच्या दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनी आणि भारत यांच्यादरम्यान 6 पाणबुड्यांच्या निर्मितीचा मोठा करार होऊ शकतो. जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस हे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पाणबुड्यांच्या निर्मितीसंबंधी भारत आता रशियाऐवजी जर्मनीसोबत करार करण्याच्या तयारीत आहे. युव्रेन युद्धामुळे रशियाकडून सैन्यसामग्रीचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने भारताला अन्य देशांकडे वळावे लागले आहे.
जर्मनीची थिसेनक्रूप एजी कंपनी आणि भारताच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात भारतीय नौदलासाठी 6 पाणबुड्यांच्या निर्मितीकरता 5.2 अब्ज डॉलर्सचा करार होण्याची दाट शक्यता आहे. जर्मनीचे संरक्षण मंत्री पिस्टोरियस हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रारंभिक करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. भारत दौऱ्यादरम्यान पाणबुडीसंबंधीचा करार अजेंड्यात असणार आहे असे पिस्टोरियस यांनी म्हटले आहे.
हा करार भारत-जर्मन धोरणात्मक भागीदारीसाठी अत्यंत मोठे पाऊल ठरणार असल्याचे उद्गार पिस्टोरियस यांनी काढले आहेत. परंतु भारतीय संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सने या प्रकरणी टिप्पणी करणे टाळले आहे. तर जर्मन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते आणि थिसेनक्रूप मरीन सिस्टीम्सच्या प्रतिनिधीनेही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. दोन वर्षांपूर्वी पाणबुडी निर्मितीसंबंधी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती, तेव्हा जर्मनीच्या या समुहाने भारतात संयुक्त स्वरुपात पाणबुडी निर्मितीत कुठलेच स्वारस्य दाखविले नव्हते.
जर्मनी प्रयत्नशील
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला चीनची साथ मिळत असल्याची धारणा पाश्चिमात्य देशांमध्ये तयार झाली आहे. अशा स्थितीत पाश्चिमात्य देश विशेषकरून जर्मनी आता भारतासोबतचे सहकार्य वाढवू पाहत आहे. पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी भारताकडून विदेशी संरक्षण कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि लार्सन अँड टुब्रोची निवड करण्यात आल्याचे समजते.
तंत्रज्ञानात अग्रेसर
जर्मनीची थिसेनव्रुप मरीन सिस्टीम्स ही प्रमुख पाणबुडी निर्मात्यांपैकी एक आहे. या समुहाकडे पारंपरिक पाणबुड्यांना दीर्घकाळापर्यंत पाण्याखाली राहण्यास सक्षम करणारे तंत्रज्ञान आहे. तसेच थिसेनव्रुप मरीन सिस्टीम्सकडून निर्मित पाणबुड्यांचा भारतीय नौदलाने यापूर्वी वापर केलेला आहे. याचमुळे दक्षिण कोरियाची देवू आणि स्पेनच्या नवंतिया कंपनीच्या तुलनेत जर्मनीच्या समुहाला अधिक चांगला पर्याय मानले गेले आहे.