अमेरिकेच्या उत्कियाविक शहरातील स्थिती
अमेरिकेच्या अलास्का प्रांतातील उत्कियाविक शहरात शुक्रवारी 66 दिवसांनी सूर्य उगवला असून तो देखील केवळ एक तासासाठी. ध्रूवीय भागातील या क्षेत्रात मागील वर्षी 18 नोव्हेंबर रोजी सूर्य दिसला होता. त्या दिवशी लोकांनी जल्लोष साजरा केला होता.
त्यानंतर शुक्रवारी दुपारी 1.16 वाजता (भारतात शनिवारी पहाटे 3.45 वाजता) सूर्योदय झाला. यादरम्यान तांबडय़ा रंगाचा सौम्य प्रकाशच दिसून आला. याचदरम्यान लोकांनी घराबाहेर पडून पारंपरिक नृत्य करत आनंद व्यक्त केला आहे. 4400 लोकसंख्या असलेल्या उत्कियाविक शहरात मेक्सिकन लोकांचे वास्तव्य अधिक आहे.
66 दिवस सूर्य न उगवण्याचा अर्थ येथे काळोखच काळोख असतो. सूर्य उगवला तरीही त्याचा प्रकाश इथपर्यंत पोहोचत नाही. याचमुळे तेथे संध्याकाळसारखा काळोख असतो. निसर्गाचे हे दृश्य अत्यंत मोहक असते.
सर्व कामे विजेच्या मदतीने
पोलर लाइटदरम्यान काम प्रभावित होत असले तरीही ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यादरम्यान बहुतांश शहर विजेच्या कैदेत असते. लोक घरांमध्ये राहून एकमेकांसोबत वेळ घालविणे पसंत करतात. चित्रपट पाहतात, गाणी ऐकतात, तसेच पुस्तकांचे वाचन करतात.
नाताळाची विशेष मजा
66 दिवसांदरम्यान येणाऱया नाताळ सणाची तेथील गंमत औरच असते. त्या दिवशी लोक एकत्र येत नाताळ साजरा करतात. दीर्घ काळोख्या रात्री समाप्त झाल्यावर लोक पारंपरिक एस्किमो नृत्य करतात. शाळा सुरू करत तेथे अनेक समारंभांचे आयोजन केले जाते. परंतु या 66 दिवसांमध्ये तेथे 10-15 फूट उंचीचा बर्फ जमा झालेला असतो, यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
क्षितिजावर येत नाही सूर्य
अलास्का हा एक ध्रूवीय भाग असून तो आर्क्टिक सर्कलमध्ये आहे. हिवाळय़ात सूर्य तेथील क्षितिजावर येत नाही. याला पोलर नाइट म्हटले जाते. सर्वसाधारण दिवसात तेथील तापमान उणे 5 अंश सेल्सिअस राहते. तर पोलर नाइटदरम्यान हा आकडा उणे 20 अंशांपर्यंत खालावतो.