महाराष्ट्र मोड्यूलप्रकरणी सहावी अटक
पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र मोड्यूलप्रकरणी अजून एकास अटक केली आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांसोबत कोंढवा येथील घरात बॉम्ब बनवण्यात आणि चाचणी करण्यात त्याचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आकीफ अतीक नाचन असे या दहशतवाद्यांचे नाव असून, एनआयने त्याला अटक केली आहे. एनआयने शनिवारी महाराष्ट्र मोड्यूल प्रकरणी देशातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात आकीफ अतीक नाचनला बोरिवली येथून अटक केली आहे. छाप्यांदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि कागदपत्रे आदी साहित्य जप्त करण्यात आले.
याबाबत एनआयएच्या वतीने प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले आहे. त्यात आकीफ अतीक नाचन हा पुणे पोलिसांनी अटक केलेले आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकांच्या कोठडीत असणारे महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३ दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांच्या सोबत कोंढव्यातील घरात इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्याचे आणि त्यांची चाचणी केली असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.
आयसीस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात एनआयने केलेली ही सहावी अटक आहे, देशाची शांतता भंग करण्याच्या आयसीसच्या कटाशी हे संबंधित आहे. याप्रकरणी एनआयए ने २८ जून २०२३ ला गुन्हा नोंदवला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला, डाॅ. अदनानली सरकार यांना अटक करण्यात आली आहे.