बास्केटबॉल या खेळात तरबेज – द ग्रेट खलीपेक्षाही अधिक उंचीची मुलगी
14 वर्षांच्या वयात एखाद्या मुलीची उंची किती असू शकते याचा अनुमान लावून बघा. या अनुमानातील उंची 7 फूट 4 इंचापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. पण चीनमध्ये राहणाऱया झांग झियूने स्वतःच्या उंचीमुळे इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या 14 वर्षीय मुलीची उंची 7 फूट 4 इंच आहे. सोशल मीडियावर तिची एक चित्रफित व्हायरल होत असून यात ती एका बास्केटबॉल सामन्यात स्वतःच्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसून येते.
पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतातील 7 फूट 4 इंचांची झांग इंटरनेटवर लोकप्रिय झाली आहे. जिंगझोउमध्ये आयोजित एका बास्केटबॉल स्पर्धेत तिने स्वतःच्या संघाला विजयी करण्यासाठी 25 रिबाउंड आणि 6 ब्लॉकसोबत 42 गुण प्राप्त करण्यास मदत केली आहे.
झांगची तुलना आता एनबीएचा माजी स्टार आणि चिनी बास्केटबॉलपटू याओ मिंग याच्यासोबत होऊ लागली आहे. याओ याची उंची 7 फूट 6 इंच इतकी आहे. पहिलीत शिकत असताना झांगची उंची 5 फूट 2 इंच होती तर 6 वीत पोहोचल्यावर तिची उंची 6 फूट 9 इंच झाली होती.
झांगचे आईवडिल दोघेही व्यावसायिक बास्केटबॉलपटू राहिले आहेत. झांगची आई यू यिंग चीनच्या राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाच्या माजी सदस्या आहेत. झांगच्या वडिलांची उंची 6 फूट 9 इंच इतकी आहे. तर आई 6 फूट 4 इंच उंचीची आहे. बास्केटबॉल सामन्यासमोर झांगसमोर कुणाचा निभाव लागत नव्हता. ती सहजपणे बॉलला बास्केटमध्ये टाकत होती.