रिक्षा-ट्रकची समोरासमोर धडक
रायपूर / वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील कांकेर जिह्यामध्ये कुरेर भागात झालेल्या भीषण अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱया रिक्षाला ट्रकची धडक बसल्यामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चौघांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलांना तसेच रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र यामध्ये 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. दुर्घटनेनंतर रिक्षाचे भाग रस्त्यावर विखुरले होते. या दुर्घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मृत मुलांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.