ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी देखील आहे, असा खळबळजनक आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच नगरविकास खात्याची आमदारांवर उधळपट्टी सुरूच आहे. ती थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च करायला हवा, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
मराठवाडय़ातील बीड जिल्ह्यात एकटय़ा ऑगस्टमध्ये 30 च्यावर आत्महत्या झाल्या. आता या मृतांवर कृषीमंत्री ‘जेसीबी’ने फुले उधळणार आहेत काय? असा सवाल देखील या अग्रलेखातून धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला आहे.
जनतेला समोरे जाण्याचे धाडस नाही
महाराष्ट्रात यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीच्या आठ टक्के पाऊस कमी झाला आहे. चालू वर्षात त्याची किती कृपावृष्टी होईल, याचा अंदाज हवामानखात्यालाही नाही. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्ह्य़ात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. मुंबई-पुण्यासारख्या शहरांवर लोंढे आदळतील. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही, असा टोलाही लगावण्यात आला आहे.