पार्किंसंसवर मात करण्यासाठी 6 वर्षांपासून बॉक्सिंग ; रिंगणात पाहून लोक होतात थक्क
मुष्टियुद्धाच्या रिंगणात ठोसा लगावताना दिसून येणाऱया नॅन्सी स्ट्रेटन यांचे वय 75 वर्षे आहे. त्यांना पार्किंसंस आजार असून त्यावर बॉक्सिंगच्या पंचद्वारे नियंत्रण मिळविता येत असल्याचे त्यांना समजले होते. याचमुळे मागील 6 वर्षांपासून त्या पंचिंग (ठोस लगावणे) करत आहेत. चमकदार ग्लोव्ह्ज आणि जांभळय़ा रंगाचे स्निकर्स परिधान करून जेव्हा त्या बॉक्सिंग रिंगमध्ये दिसतात, तेव्हा लोकांना थक्क व्हायला होते.
तुर्कस्तानात राहणाऱया नॅन्सी आठवडय़ातून 3 दिवस बॉक्सिंग करतात. मेडिटेरियन प्रांताच्या एंटाल्या येथे त्यांचे वास्तव्य आहे. बॉक्सिंग केल्याने पार्किंसंस पूर्णपणे संपुष्टात येत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो याची कल्पना नॅन्सी यांना त्यांच्या जिम ट्रेनरने दिली आहे.
एक वयोवद्ध महिला जिच्या तोंडात दातही शिल्लक नाहीत, तिला बॉक्सिंग रिंगमध्ये पाहून लोकांना आश्चर्य वाटले होते. इतक्या अधिक वयाच्या कुठल्याही महिलेला बॉक्सिंग करताना त्यांनी पाहिले नव्हते असे नॅन्सी सांगतात. इस्तंबुलच्या रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट गेसू कार्लिकाया यांच्यानुसार पार्किंसंसवर झालेल्या विविध संशोधनांमध्ये बॉक्सिंग मेंदूला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करत असल्याचे दिसून आले आहे. बॉक्सिंगच्या सरावामुळे पार्किंसंसचा प्रभाव कमी होत असल्याचे गेसू यांचे सांगणे आहे.