मिझोराममधील अनोखे उदाहरण : शाळेत जाण्यासाठी 3 किमी पायपीट
वृत्तसंस्था /चंपाई (मिझोराम)
‘वाचायला आणि शिकायला वयाची अट नसते’ ही पंक्ती पूर्व मिझोराममधील एका 78 वषीय आजोबांनी सत्यात उतरवली आहे. लालरिंगथारा नावाच्या व्यक्तीने इयत्ता नववीत प्रवेश घेत शिक्षणाच्या ध्यासाचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. लालरिंगथारा यांचे शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना आपल्या शैक्षणिक वाटचालीला अर्धविराम द्यावा लागला होता. मात्र, आता वयाच्या 78 व्या वर्षी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते दररोज 3 किलोमीटर पायपीट करत मुलांसोबत बसून अभ्यास करतात. लालरिंगथारा हे सध्या न्यू हुआईकॉन चर्चमध्ये सुरक्षारक्षक (गार्ड) म्हणूनही काम करतात. हे काम करत असतानाच ते उर्वरित शिक्षणाचे धडेही गिरवत आहेत. लालरिंगथारा यांचा जन्म 1945 मध्ये भारत-म्यानमार सीमेजवळील खुआंगलेंग गावात झाला. एकुलता एक मुलगा असल्यामुळे वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच शेतात काम करून आईला आधार द्यावा लागला. 1995 मध्ये ते आपले गाव सोडून न्यू हुआईकॉन गावात स्थायिक झाले. या सर्व व्यापामुळे त्यांचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. मात्र, आता ते पूर्ण करण्यासाठी ते धडपडत आहेत. सध्या त्यांना मिझो भाषा वाचण्यात आणि लिहिण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण त्यांना इंग्रजी शिकण्याचा ध्यास निर्माण झाला आहे. इंग्रजी भाषेतून अर्ज लिहिणे आणि बोललेली भाषा समजण्याइतपत ज्ञान अवगत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. लालरिंगथारा हे शाळेत येताना शालेय गणवेशातच वेळेत हजर होतात आणि मन लाऊन अभ्यासात लक्ष देतात, असे न्यू हुआईकॉन मिडल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. आजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी ते एक ‘उदाहरण’ आहे.