केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पर्यटक : मृत्यूमागे वायूगळतीचे कारण असण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ काठमांडू
8 भारतीय पर्यटक नेपाळच्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. या पर्यटकांना एअरलिफ्ट करून काठमांडूच्या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे नेपाळच्या पोलिसांनी मंगळवारी सांगितले आहे. सर्व मृत पर्यटक हे तिरुअनंतपुरमचे रहिवासी होते आणि त्यांचे मृतदेह काठमांडू येथून भारतात आणले जात असल्याची माहिती विदेश राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे.
मृतांमध्ये रंजीत आणि प्रवीण समवेत त्यांच्या पत्नी आणि 4 मुलांचा समावेश आहे. श्वास कोंडला गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 15 सदस्यीय समूह केरळमधून नेपाळमध्ये दाखल झाला होता. भारतात परतण्यापूर्वी हा समूह मकवानपूर जिल्हय़ाच्या दमण येथील एव्हरेस्ट पॅनोरमा रिजॉर्टमध्ये उतरला होता. सर्व जण सोमवारी रात्री 9.30 वाजता रिजॉटमध्ये पोहोचले होते. त्यांनी खोली उबदार करण्यासाठी गॅस हीटर चालू केला होता. यातील 8 जण एकाच खोलीत थांबले होते.
या खोलीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. हे सर्वजण बेशुद्ध असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱयाने दिल्यावर त्यांना एअरलिफ्ट करत काठमांडूच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या पर्यटकांच्या मृत्यूमागे वायूगळती कारणीभूत असू शकते.
खराब गॅस हीटरमुळे खोलीत कार्बन मोनोऑक्साईड वायू निर्माण होतो. रंग तसेच गंधरहित असलेला हा वायू अत्यंत विषारी असतो. या वायूमुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते. तसेच यामुळे शरीराचे जवळपास सर्व अवयव प्रभावित होऊ लागतात आणि हेच मृत्यूचे कारण ठरते.