संयुक्त राष्ट्रसंघाचा अनुमान ः चीन मात्र चिंतेत
वृत्तसंस्था / बीजिंग
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुमानानुसार जागतिक लोकसंख्या 15 नोव्हेंबर म्हणजेच आज 8 अब्जाचा आकडा ओलांडणार आहे. जागतिक लोकसंख्या 2022 च्या अहवालानुसार जागतिक लोकसंख्या 2080 दरम्यान 10.4 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे. या अहवालानुसार 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे.
चीनने मागील वर्षी मुलांच्या संख्येवरील निर्बंध हटविले हेते. तसेच दांपत्याला 3 अपत्यांना जन्म देण्याची अनुमती दिली होती. देशाचा जन्मदर योग्य राखण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे चीन सरकारने म्हटले होते. चीनमध्ये मनुष्यबळाचे घटत चाललेले प्रमाण एक नव्या प्रकारचे आव्हान निर्माण करत आहे. चीनमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत असल्याची त्याच्यासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. चीनमध्ये सध्या 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येत 13 टक्के इतके आहे. तरुणाईचे घटते प्रमाण आगामी काळात चीनच्या उद्योगजगतात कामगार किंवा कर्मचाऱयांची मोठी कमतरता निर्माण करू शकते.
चीनमधील जन्मदर खूपच कमी आहे. जन्मदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये आता चीनचा समावेश झाला आहे. चीनमधील जन्मदर 2021 मध्ये 1.16 होता. तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी 2.1 इतका जन्मदर असावा लागतो. चीनमध्ये चालू वर्षात मुले जन्माला देण्याचा दर नीचांकी स्तरावर राहू शकतो. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असू शकते. जन्माला येणाऱया मुलांचा आकडा 1 कोटीवर येऊ शकतो. तर मागील वर्षी हा आकडा 1 कोटी 60 लाख इतका होता.