कच्च्या तेलाचा दर 5 टक्क्यांनी कमी : तरीही पेट्रोल 80 पैसे, डिझेल 70 पैशांनी महाग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर आता काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत. तरीही देशात मागील 8 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी 8 व्या दिवशी 7 व्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात 80 पैसे आणि डिझेलच्या दरत 70 पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. 5 महिन्यांनी दिल्लीत पेट्रोल पुन्हा 100 रुपये प्रतिलिटर या दरावर पोहोचले आहे.
तेल विपणन कंपन्यांच्या नुकसान भरपाईसाठी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-20 रुपयांची वाढ करावी लागणार असल्याचे क्रिसिल रिसर्चच्या एका अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील बाब खरी मानल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमतीत द्याप आणखीन 18 रुपयांची वाढ होऊ शकते.
भारतातील आघाडीचे इंधन वितरक आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना नोव्हेंबर ते मार्चदरम्यान सुमारे 2.25 अब्ज डॉलर्सच्या (19 हजार कोटी रुपये) महसुलाचे नुकसान झाले आहे. रिफायनरींना नुकसानीपासून वाचविण्यासाठी सरकार किमती वाढविण्याची अनुमती देईल असे मूडीज रेटिंग एजेन्सीने म्हटले होते.
जीएसटीच्या कक्षेत आणले जावे
पेट्रोलियम उत्पादकांना जीएसटीच्या कक्षेत आणल्यास मोठी मदत होणार असल्याचे पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप मुल्तानी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास अर्थव्यवस्थेला याचा लाभ होणार आहे. इंधनाचे प्रतिदिन वाढणारे दर पाहता आता जीएसटीच्या अंतर्गत पेट्रोल-डिझेल आणण्याचा निर्णय घेतला जावा असे त्यांनी नमूद केले आहे.