आपल्या देशात गरीबी खूप आहे. त्यातून भ्रष्टाचारही आहे. त्यामुळे गुणवान लोकांना संधी मिळणे आणि नोकरी मिळणे कित्येकदा दुरापास्त होते. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत, त्याचे स्वप्न अमेरिकेत काम मिळावे असे असते. अमेरिकेत वेतन भरपूर असते. तिथे जागाही मोठ्या मिळतात. कित्येक भारतीयांनी तेथे आलिशान बंगले बांधले आहेत, असे आपण ऐकलेले असते. ते सुख आपल्यालाही मिळावे अशी जवळपास प्रत्येकाची सुप्त इच्छा असतेच असते.
पण अमेरिकेतही अत्यंत कमी उत्पन्नाचे लोक आहेत. त्यांची घरे भारतातील झोपड्यांइतक्या किंवा त्यांच्याहीपेक्षा लहान आकाराची आहेत. अशा घरांमध्ये राहून दिवस कंठणाऱ्यांची संख्या तेथे कमी नाही. अशीच एक अलैना रँडेजो नामक विद्यार्थिनी असून तिने आपल्या घराची छायाचित्रे सोशल मिडियावर टाकल्याने ही स्थिती स्पष्ट झाली. तिचे घर अवघे 80 चौरस फूट आहे. त्या घरात एक स्वयंपाकघर आणि एक बेडरुम एवढीच जागा आहे. ती न्यूयॉर्कसारख्या वैभवी शहरात राहते. तिच्या घराला बाथरुमही नाही आणि खिडक्याही नाहीत. म्हणजे मुंबईच्या झोपडीसारखीच तिच्या घराची स्थिती आहे. आपल्या कल्पनेतली अमेरिका आणि वास्तवातील अमेरिका यांच्यातील अंतर यातून स्पष्ट होते. अर्थात, अमेरिकेत वैभव आहेच. अशी घरे तिथे अपवादात्मकच असतील. पण ती आहेत, हीं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विनाकारण भलत्याच कल्पना करणेही अवास्तव ठरते. शेवटी. दुरून डोंगर साजरे, असे म्हणतात ते काही खोटे नाही.