केंद्र सरकारने राज्यसभेत दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीआरपीएफ आणि बीएसएफ यासारख्या 6 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) स्वीकृत पदांची एकूण संख्या 10 लाख 5 हजार 520 इतकी आहे. यातील 84,866 पदे रिक्त असल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल राज्यसभेत दिली आहे. मागील 5 महिन्यांमध्ये सीएपीएफमध्ये 31,785 कर्मचाऱयांची भरती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मागील तीन वर्षांमध्ये सीआरपीएफ तसेच बीएसएफ यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील एकूण 436 जवानांनी आत्महत्या केली आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्समध्ये आत्महत्या तसेच सहकाऱयांच्या हत्या रोखण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी एका कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. 2022 मध्ये एकूण 135, 2021 मध्ये 157 आणि 2020 मध्ये 144 जवानांनी आत्महत्या केली असल्याचे राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल म्हटले आहे.
1,827 एनजीओंची एफसीआरए नोंदणी रद्द
सरकारने मागील 5 वर्षांमध्ये कायद्यांचे उल्लंघन करणाऱया 1,827 स्वयंसेवी संस्थांची एफसीआरए नोंदणी रद्द केली आहे. 2018-22 या कालावधीत अधिनियम आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याने 1,827 एनजीओंचे एफसीआरए नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. 10 मार्च 2023 पर्यंत एफसीआरए-नोंदणीकृत 16,383 एनजीओ होत्या असे त्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा
2018-22 या कालावधीत आयआयटी, एनआयटी आणि आयआयएम यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये 55 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल दिली आहे.
गगनयान मोहीम
सरकारने गगनयान मोहिमेसंबंधीही माहिती दिली आहे. महामारीच्या प्रभावांमुळे गगनयानच्या चालक दलाच्या पहिल्या मोहिमेच्या प्रक्षेपण कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता हे अंतराळवीर 2024 च्या अखेरपर्यंत अंतराळात जातील. गगनयानसंबंधी विविध प्रणालींचे डिझाइन पूर्ण झाले आहे. कार्यक्रम परीक्षणाच्या टप्प्यात पोहोचला असल्याचे सांगण्यात आले.