भोळेपणाचा घेतला गैरफायदा, नऊजणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/खेड
शहरातील वयोवृद्ध उद्योजकाच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन करत नऊजणांनी 85 लाख 82 हजार 161 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
या प्रकरणी अरविंद चंदुलाल तलाठी (66, तीनबत्तीनाका-खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 जणांवर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 डिसेंबर 2021 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विकम सरोही, श्रीवास्तव, राणा, कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित सदाशिव मुदलिक, विठ्ठलभाई पटेल, अभय शुक्ला, प्रमोद ठाकूर अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. या नऊहीजणांची पूर्ण नावे व पत्ते नाहीत. या 9जणांनी तलाठी यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जुन्या पॉलिसीचा संदर्भ देत विश्वास संपादन केला. वेळोवेळी विविध कारणे सांगून त्यांच्या आय.सी.आय.सी.आय. बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेमधून रक्कम काढण्यासाठी तब्बल 48वेळा व्यवहार करण्यात आला.
या बँकांतून एनएफटीद्वारे व आयसीआयसीआय बँकेतून रोखीने पैसे काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या नऊजणांनी 85 लाख 82 हजार 161 रूपयांची रक्कम काढून ऑनलाईन फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार 9 जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : रत्नागिरी शहरात ४ दुकाने फोडली