वडूज, प्रतिनिधी
Satara Birds News : खटाव तालुक्यातील येरळवाडी हे वडूजपासून सात किमी अंतरावर आहे. येरळवाडी येथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्न साठ्यामुळे रोहित पक्षी (प्लेमींगो) या परिसरात स्थायीक होताना दिसून येत आहे. मनाला भूरळ घालणारे 9 स्थलांतरित प्लेमिंगो पक्षी मुक्कामास आल्याने परिसरात किलबिलाट वाढला आहे.प्रथम मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभय अरण्यात व कानकात्रे येथे पक्षाचे वास्तव्य असायचे.त्यामुळे त्यांनी येरळा तलाव परिसरात सुरक्षितेला प्राधान्य देत त्यांनी आपले वास्तव्य येरळवाडी मध्यम प्रकल्पावर हलविले आहे.
खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी ,मायणी येथील अभयआरण्य तलावात मुबलक पाणीसाठा नसून अन्नसाठा व सुरक्षेतेचा अभाव असल्याने आपसुकच परदेशी पाहुण्यांनी येरळा तलावाला प्राधान्य दिले. तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही दिसत असून,सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत.येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत.यामध्ये प्रारंभी 9 फ्लेमिंगो पक्षी विराजमान झाले आहेत.
गेल्या वर्षी खटाव तालुक्यावर वरूणराजाची कृपा होती.त्यामुळे येरळवाडी तलाव फुल्ल भरले होते.मात्र या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणी साठी अल्प झाला आहे.त्यामुळे परदेशी पाहुण्यांचे येरळवाडी तलावात आगमन झाले आहे.प्लेमिंगो हा समुद्र पक्षी म्हणून ओळखला जातो.ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सैबेरिया,चीन,अफगाणीस्तान,रशिया आदी देशातून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. महाराष्ट्रात त्यांचा येण्याचा कालावधी हा डिसेंबरचा पहिला आठवडा असतो. गुलाबी थंडीमध्ये त्यांचे प्रमाण ज्यादा असते पण यावेळी त्यांचे आगमन ऑगस्टमध्येच झाले आहे.
सध्या तलावात चित्रबलाक,करकोचा,कांडेसर,स्पून बिल,काळा शराटी,पान कावळा,खंड्या,कवड्या,कवड्या तुतारी,शेकाट्या,जांभळी पाणकोंबडी,चक्रवाक,नदीसुरय,सुतारपक्षी,ग्रे हेरॉन,चांदवा,कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे.हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली,कोल्हापूर,पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.
दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमीचे आकर्षण आहे.त्याचा रंग पांढरा , गुलाबी किंवा लालसर असून उंची दीड ते दोन मीटर असते त्याचा लांब गळा ,काठी सारखे पाय आणि गुलाबी लालसर पंख ,गुलाबी रंगाची चोच तसेच लांब मान हे देखण्या पक्षाचे वैशिष्ठ आहे. तलाव्यात पाणीसाठा असल्याने या पक्षांना खाद्य खाण्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा आहे.तर तलाव परिसरात दलदलीच्या भागात फ्लेमिंगो पक्षी मासे कीटक,आटोलिया सारख्या वनस्पतींच्या शोधत मुक्तविहार करताना दिसत आहेत.त्यांच्या आकर्षक छबीचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी तलाव्याकडे धाव घेत आहेत.
दरम्यान, दरवर्षी डिसेंबर महिना अखेर येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात.पण या वर्षी ऑगस्टमध्येच पक्षी आले आहेत.येरळवाडी येथील शेतकरी व पक्षी मित्र बाळासाहेब पोळ यांच्या घरावरून घिरट्या मारून जाताना रविवार (दि-६ )रोजी सांयकाळी प्लेमिंगो पक्षाचा आवाज ऐकावयास मिळाला.त्यांनी तातडीने पक्षी अभ्यासक डॉ.प्रविण चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.परदेशी पाहुण्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात.सध्या फ्लेमिंगो पक्षी आल्याने पक्षी प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.खटाव तालुक्यातील येरळवाडी तलाव परिसरात फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत.या तलावात मुबलक व पुरेसा पाणीसाठ्यासह खाद्य उपलब्ध असल्याने पक्षीमित्रांत आनंदाचे वातारणात निर्माण झाले आहे.
यापूर्वी मुंबई परिसरात सुमारे दिडलाख प्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले होते. त्यातील 30 टक्के पक्षी स्थायीक झाले.कारण सुरक्षित पाणथळे व मुबलक अन्न पुरवठा असल्याने ते स्थायीक झाले.या पाहुण्यांचे सातत्य टिकविण्यासाठी तलाव परिसरातील जैविक विविधता जोपासने काळाची गरज आहे.
डॉ.प्रविण चव्हा,पक्षी अभ्यासक