ठिकठिकाणी नाकाबंदी करून शोधमोहीम
कोहिमा / वृत्तसंस्था
नागालँडमधील तुरुंगातून रविवारी 9 कैदी फरार झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. राज्यातील सोम जिल्हा कारागृहातून 9 कैदी फरार झाल्याने कारागृह प्रशासन अडचणीत आले आहे. कैद्यांना पकडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम राबविली जात आहे. फरार झालेल्या कैद्यांमध्ये अंडरट्रायल आणि खुनाच्या गुन्हय़ातील दोषींचा समावेश आहे. कैद्यांनी आपल्या सेलच्या चाव्या मिळवून रविवारी पहाटे ते फरार झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
कैदी फरार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. कारागृहातून पळून गेलेल्या लोकांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा कारागृहातून कैद्यांच्या पलायनाची बाब अत्यंत गंभीर असून कारागृह प्रशासनही संशयाच्या भोवऱयात सापडले आहे. कारागृहातील बडे अधिकारी सध्या यासंबंधी काहीही बोलण्याचे टाळत आहेत. कैद्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे.