कामगार खात्याची डोकेदुखी वाढली : कामगारांच्या मुलांना होणार वितरण
बेळगाव : कामगार विभागाने लॅपटॉप वाटपासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यात केवळ 280 लॅपटॉपसाठी 9 हजार 451 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कामगार खात्यासमोर डोकेदुखी वाढली आहे. अर्ज दाखल करण्याची 19 सप्टेंबर शेवटची तारीख होती. जसजसा शेवटचा दिवस येईल तसतशी अर्जदारांची संख्या वाढली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी लॅपटॉप वाटप केले जाणार आहेत. जिल्ह्यात 2 लाख 30 हजारांहून अधिक बांधकाम कामगार आहेत. त्यामध्ये गवंडी, सेंट्रिंग, प्लंबर, पेंटर, वायरमन, फेब्रीकेटर आदींचा समावेश आहे. या कामगारांच्या मुलांना लॅपटॉप वाटप केले जाणार आहेत. पीयुसी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध आहे. दहावी आणि अकरावी परीक्षेत मिळविलेल्या गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे. यासाठी शिष्यवृत्ती, लॅपटॉप आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र कोरोनाच्या दोन वर्षांत कामगारांच्या मुलांना या सर्व सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. यंदा शिष्यवृत्ती जरी मिळत नसली तरी लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. मात्र जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत केवळ 280 लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे कोणाचे भाग्य उजळणार, हे पहावे लागणार आहे.
पाच सदस्यीय निवड समिती
लॅपटॉपसाठी अर्ज केलेल्या कामगारांच्या मुलांची निवड करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार खात्याचे अधिकारी, कामगार संघटना सदस्य, शिक्षण अधिकारी आदींच्या निवड समितीत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
गुणवत्तेच्या आधारावर होणार निवड
जिल्ह्यात 280 लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड केली जाणार आहे. नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना लाभ मिळणार आहे.
– डी. जी. नागेश, कामगार खाते आयुक्त