बीजिंग / वृत्तसंस्था
चीनमध्ये 90 कोटी नागरिकांना कोरोनाने ग्रासले असल्याचा धक्कादायक अहवाल याच देशातील पेकिंग विद्यापीठाच्या संशोधकानी सादर केला आहे. 11 जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी आहे. चीनच्या एकंदर लोकसंख्येच्या 64 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गन्सू प्रांतात हे प्रमाण 91 टक्के आहे.
या खालोखाल संख्या युनान प्रांतात असून तेथे 84 टक्के जनतेला कोरोना आहे किंवा होऊन गेलेला आहे. क्विंघाई प्रांतात 80 टक्के लोक कोरोना बाधित आहेत किंवा होते. आता कोरोनाचा हा महाप्रसार खेडय़ांमध्ये होण्याची शक्यता आहे. नव्या चांद्रवर्षाचा प्रारंभ करण्यासाठी लक्षावधी चीनी नागरीक शहरांमधून आपल्या खेडय़ांपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे खेडय़ांमध्ये कोरोना झपाटय़ाने पसरेल अशी रास्त चिंता चीनमधील विद्वान व्यक्त करीत आहेत.
अनेकजण प्रथमच खेडय़ांकडे
गेली दोन वर्षे चीनमध्ये कठोर लॉकडाऊन राखण्यात आला आहे. लोकांना आपली शहरे सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक लोक या कोरोना काळात आपल्या मूळ गावी जाऊ शकलेले नाहीत. आता अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना गावाकडे जाण्याची संधी मिळत असल्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता लोक खेडय़ांकडे धावत आहेत.
रुग्णालयांमध्ये जागा नाही
चीनच्या जवळपास सर्व शहरांमधील रुग्णालयांमध्ये आता नव्या कोरोना रुग्णांसाठी जागा उरलेली नाही. रुग्णालये रुग्णांनी ओसंडून भरलेली आहेत. त्यांना बेड्स् अपुरे पडत असल्याने जागा मिळेत त्या ठिकाणी त्यांना झोपवून उपचार केले जात आहे. कोरोनाचा हा चौथा उदेक चीनसाठी अत्यंत त्रासदायक ठरला आहे. चीनच्या प्रशासनाने कोराना रुग्णांची दैनंदिन संख्या घोषित करण्याची पद्धती बंत केली आहे. आठवडय़ानंतर किंवा महिन्यानंतर ही संख्या एकदम घोषित केली जाते. त्यामुळे जनतेमध्ये आणि जगातही चीनबद्दल संशय वाढला आहे.
21 जानेवारीनंतरचा काळ महत्वाचा
चीनी चांद्रवर्षाचा प्रारंभ 21 जानेवारीपासून होत आहे. चांद्रवर्ष प्रारंभाचा हा उत्सव आठ ते दहा दिवस चालतो. हा कालावधी साजरा करण्यासाठी असंख्य चीनी कामातून रजा घेऊन गावांकडे चालले आहेत. ते तेथे पोहचतील आणि कोरोनाचा प्रसार नव्या भागांमध्ये करतील, अशी शक्यता आहे. ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मर्यादित होता. पण 21 जानेवारीनंतर खेडय़ांमधील स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे.