एकूण 31 पैकी 29 जणांचे मतदान : काँग्रेस भरारी घेईल : अमित पाटकर
प्रतिनिधी / पणजी
काँगेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपद निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात व गोवा राज्यातही काल सोमवारी मतदान झाले. गोव्यात 31 मतदारांपैकी 29 जणांनी मतदान केले. गोवा प्रदेश काँग्रेस अध्य़क्ष अमित पाटकर यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. पणजीतील काँग्रेसच्या कार्यालयात हे मतदान झाले. नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गोव्यासह देशभरात पुन्हा भरारी घेईल, अशी अपेक्षा पाटकर यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही लढत होणार असून बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गोव्यात या निवडणुकीसाठी 93 टक्के मतदान झाल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
मतदान सकाळी 10 वा. सुरु होऊन सायंकाळी 5 पर्यंत चालू होते. सर्व राज्यातील मतपेटय़ा दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात जमा करण्यात येणार आहेत. देशभरात एकूण 9000 मतदार या निवडणुकीत मतदानासाठी पात्र आहेत, अशी माहिती पाटकर यांनी दिली. काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकशाहीच्या मार्गाने राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार असून नवीन अध्यक्षामुळे काँग्रेस पक्षाचे मनोधैर्य वाढेल, असे पाटकर यांनी नमूद केले. निवडणुकीत चांगला उत्साह दिसून येत असून तो पुढेही काँग्रेस पक्षात कायम राहील, असे निवेदन त्यांनी केले.