जीएसटी विभागाने बजावली 11 हजार कोटींची नोटीस
प्रतिनिधी/ पणजी
बंगळूर येथील जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांनी डेल्टा कॉर्प या कंपनीवर कारवाईचा हातोडा उगारून सुमारे 11 हजार कोटींची नोटीस बजावली आहे. गोव्यातील कॅसिनोंच्या माध्यमातून कोट्यावधी ऊपयांची उलाढाल करताना डेल्टा कॉर्पोरेशनने जीएसटी कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
बंगळूर येथील जीएसटी विभागाच्या आयुक्तांनी डेल्टा कॉर्पोरेशनला यापूर्वी वारंवार नोटीस पाठवून जीएसटी भरण्यासंदर्भात सूचना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सुमारे 16 हजार 822 कोटी ऊपयांची जीएसटी थकबाकी झाल्याने त्यांना सुमारे 11 हजार 139.61 कोटी ऊपयांची जीएसटी थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे.
डेल्टा कॉर्पोरेशनच्या तीन उपकंपन्या असून, त्यांचीही जीएसटी थकबाकी असल्याने 5682 कोटी ऊपयांची दुसरी नोटीस डेल्टा कॉर्पोरेशनच्या तीन उपकंपन्यांना बजावण्यात आली आहे. डेल्टा प्लेजर, कसिनो डेल्टीन डेन्झॉन्ग आणि डायस्ट्रीट क्रुझ ह्या तीन उपकंपन्या असून, डेल्टा पेजर क्रुझ हे पर्वरी येथे आहे. या कंपनीचा मांडवी नदीत ऑफशोरकॅसिनो आहे. जुलै 2017 ते मार्च 2022 पर्यंतची जीएसटी कराची थकबाकी या कॅसिनोनो भरलेली नाही. कंपनीने जीएसटी रक्कम भरली नाहीतर कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात येणार असल्याचे समजते.
जीएसटी संचालनावर कंपनीचे आरोप
डेल्टा कॉर्पोरेशन या कंपनीने जीएसटी संचालनालयावर आरोप करताना सांगितले की, जीएसटी संचालनालयाने बजावलेली नोटीस मनमानी पद्धतीने बजावली आहे. लागू करण्यात आलेला कर आणि बजावलेली नोटीस हे दोन्हीही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नोटिसीला कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.