दाबोळी विमानतळावर खळबळ : जामनगर हवाई तळावर विमान तातडीने उतरविले
प्रतिनिधी /वास्को
रशियातून गोव्याकडे उड्डाण केलेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने सोमवारी रात्री दाबोळी विमानतळावर एकच खळबळ उडाली. खबरदारी म्हणून हे विमान तातडीने गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावर उतरविण्यात आले आणि विमानाची आणि हवाई प्रवाशांची कडक तपासणी सुरू झाली. या विमानात अडीचशे रशियन प्रवासी होते. मध्यरात्रीपर्यत हे विमान गोव्यात पोहोचले नव्हते.
गोव्यात पर्यटन हंगामात येणाऱया विदेशी पर्यटकांमध्ये रशियन पर्यटकांची संख्या मोठी असते. रशियातून मोठय़ा प्रमाणात शेकडो प्रवाशांना घेऊन चार्टर विमाने दरवर्षी गोव्यात येत असतात. अशाच वर्गातील एका विमानाने सोमवारी रात्री जवळपास अडीचशे पर्यटकांना घेऊन गोव्याकडे प्रयाण केले होते. या विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर बऱयाच वेळाने त्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे वृत्त मॉस्कोतील विमानतळावर धडकले. त्यानंतर रशियाच्या यंत्रणेने भारतीय यंत्रणेला सतर्क केले. सदर विमान थेट गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरणार असल्याने दाबोळी विमानतळावर एकच खळबळ माजली. सुरक्षेसाठी दहशतवाद विरोधी पोलिसांचे पथक, गोवा पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथकासह, नौदल आणि सीआयएसफ अशी सारीच सुरक्षा यंत्रणा दाबोळी विमानतळावर एकवटली. अग्निशामक दल, रुग्णवाहिका असे सर्व काही तैनात करण्यात आले. बचाव कार्यासाठी तोंड देण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांनी ठेवलेली असतानाच सदर रशियन विमान तातडीने गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावर उतरविण्यात आले. त्यामुळे दाबोळीवर तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांचा भार थोडा हलका झाला. मात्र, मध्यरात्रीनंतरसुद्धा दाबोळी विमानतळावर सुरक्षा यंत्रणा तैनात होती. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही विमानतळावर होते.
उपलब्ध माहितीनुसार गोव्याकडे येणारे रशियन विमान सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दाबोळीवर उतरणार होते. मात्र, विमानात बॉम्ब असल्याची खबर मिळाल्याने धोका टाळण्यासाठी ते विमान गोव्यापेक्षा जवळ असलेल्या जामनगरला उतरविण्यात आले. त्या ठिकाणी हवाई प्रवासी, त्यांचे सामानसुमान तसेच हवाई जहाजाची पूर्ण तपासणी हाती घेण्यात आली. हे काम मध्यरात्रीपर्यत चालूच राहिल्याने विमान मध्यरात्रीनंतरही गोव्याकडे पोहोचलेच नाही. या विमानात विस्फोटक वस्तू किंवा अन्य काही संशयास्पद साहित्य आढळून आले काय याची माहिती उपलब्ध झाली नाही. रशियाच्या चार्टर विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती अनाहुत व्यक्तीने फोनवर एका एअरलाईन्सलाही दिल्याचे समजते. रशियातील चार्टर हवाई वाहतूक कंपनीनेही दाबोळीवर संपर्क साधून सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.