माणूस श्वास घेतो आणि त्याशिवाय तो जगू शकत नाही, हे आपल्याला माहीत आहे. गेल्या 50 वर्षांपासून मानवाची जवळपास सर्व कामे करणारे यंत्रमानव संशोधकांनी जन्माला घातले आहेत. या यंत्रमानवांची क्षमता कितीही असली, तर मानवाला पर्याय ते होऊ शकत नाहीत, अशी आपली समजूत आहे. तथापि, मानवासारखाच यंत्रमानव निर्माण करण्याचा ध्यास संशोधकांनी घेतला आहे.
याच संशोधनातील पुढचा टप्पा गाठताना संशोधकांनी श्वास घेणाऱ्या यंत्रमानवाचा निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. हा यंत्रमानव केवळ श्वास घेतो असे नव्हे, तर त्याला अधिक काम झाल्यास माणसाप्रमाणे घामही येतो. अशा प्रकारचा हा जगातील प्रथमच यंत्रमानव असल्याचे प्रतिपादनही करण्यात आले आहे. त्याला घामेजणारा यंत्रमानव किंवा ‘स्वेटी रोबो’ असे नाव देण्यात आले आहे. त्याची रचना अक्षरश: मानवासमान करण्यात आली असून जरा दुरुन पाहिले, तर माणूस आणि त्याच्यातील अंतरही ओळखणे कठीण जात आहे.
याला मानवासारखीच त्वचा देण्यात आली असून या त्वचेचे 35 थर आहेत. अमेरिकेच्या थर्मेट्रिक्स या कंपनीने त्याची रचना केली आहे. त्याला उकडू लागले की घाम येईल आणि थंडी वाजू लागली की तो माणसाप्रमाणेच थरथर कापेलही. याच रचनेच्या आधारावर बालयंत्रमानही निर्माण करण्यात आला आहे. या यंत्रमानवाचा उपयोग माणसाची कामे करण्यासाठीच होणार आहे. तथापि, अद्यापही तो मानवाला पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेला नाही, कारण त्याचे नियंत्रण मानवाच्याच हाती राहणार आहे. ही निर्मिती आश्चर्यकारक मानली जात आहे.