मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ म्हापसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2023-24 सालाकरिता सादर केलेला अर्थसंकल्प उत्कृष्ट असून समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारे आहे. या अर्थसंकल्पात प्रत्येक खात्याला विकास कामाकरिता व इतर कार्याकरिता योग्य निधी उपलब्ध करून दिला आहे. आता फक्त त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी केली तरच त्याचा लाभ जनतेला होईल आणि तसे त्यांनी करावयास हवे, असे मत गोवा भारतीय जनता पक्ष, इतर मागासवर्गीय विभागाचे सचिव तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी व्यक्त केले.
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत भाजपा ओबीसी विभागाचे अध्यक्ष गिरीश उसकईकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक, उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, मंगेश कासकर आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या स्तरावर विकास कसा करावा, याचा परिपूर्ण अभ्यास करून मुख्यमंत्र्यांनी हा सर्वोत्तम अर्थसंकल्प सादर केलेला आहे, असे सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी जो इतर मागासवर्गीय समाजाचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांना न्यायालयाने दिलेली शिक्षा योग्यच आहे. गोव्यात 19 प्रकारचे इतर मागासवर्गीय समाज असून एकूण जनतेपैकी 65 टक्के जनता ही इतर मागासवर्गीय आहे, त्यांनी तेली समाजास उद्देशून जरी वक्तव्य केले असले तरी सर्व इतर मागासवर्गीय जनतेच्या भावना त्यांनी दुखावल्या आहेत, असे सोपटे यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जातात आणि काही बरळतात. विदेशात जाऊन भारतीय संविधान खतरेमे है असे सांगतात ते कोणत्या आधारावर, त्यांनी लोकांना भडकाविण्याचे जे काम सुरू केले आहे ते खपवून घेतले जाणार नाही. 2019 मध्ये तेली समाजाला उद्देशून त्यांनी जे वक्तव्य केले होते त्याबद्दल कोर्टाने त्यांना योग्य शिक्षा दिली आहे. कायदा हा सर्वांना समान आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करतात, हे योग्य नव्हे. तो न्यायालयाचा एक प्रकारे अवमान आहे, असे भाजपा ओबीसी विभागाचे गोवा अध्यक्ष गिरीश उसकईकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींना भरघोस मदत जाहीर करून दोन्ही जिह्यात जिल्हा पंचायत भवन बांधण्याची तरतूद केल्याबद्दल उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी त्यांचे आभार मानले. राहुल गांधी यांना दिलेली सजा योग्य असून त्यांचे बेताल वक्तव्य करण्याची सवय वातावरण दूषित करण्याचे काम करीत आहे. ‘गीरा तो भी टांग उपर’ असा त्यांचा प्रकार असल्याचे सिद्धेश नाईक यांनी सांगितले. राहुल गांधी यांना शिक्षा फर्मावल्यानंतर काँग्रेस नेते व कार्यकर्ते जे आंदोलन करीत आहे, ते न्यायालयाच्या विरोधात असल्याचे महानंद अस्नोडकर यांनी यावेळी सांगितले, शेवटी मंगेश कासकर यांनी सर्वांचे आभार मानले.