अतिवाड येथील घटनेने शेतकऱ्यांत हळहळ : नुकसानभरपाईची मागणी
बेळगाव : विद्युतभारित वाहिनी तुटून खांबावर पडली. त्या खांबाला बैलाचा स्पर्श झाल्याने बैल जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी दुपारी अतिवाड येथे घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांला सुमारे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. सुरेश यल्लाप्पा कामेवाडी असे बैल मालकाचे नाव आहे. सुरेश कामेवाडी हे आपल्या शेतात भातरोप लागवडीसाठी मशागत करीत होते. दरम्यान अति दाबाची विद्युतवाहिनी तुटून खांब्यावर पडली होती. या खांब्याला बैलाचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या बैलाला याचा झटका बसला असून, तातडीने त्याच्यावर उपचार झाल्याने तो सुदैवाने बचावला आहे. शिवाय बैल मालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी दीपक यल्लीगार हेस्कॉम अधिकारी देवेंद्र भगनाली, अर्जुन पाटील, सागर पावशे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. वादळी पावसाने विविध ठिकाणी खांब आणि तारांची पडझड सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. आता तरी हेस्कॉम लक्ष देणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
भरपाई मिळण्याची मागणी
सुरेश यांचा एक बैल दगावल्याने त्यांच्यासमोर शेती कशी करायची असा प्रश्न पडला आहे. ऐन कामाच्या दिवसातच बैल दगावल्याने मोठे संकट उभारले आहे. त्याना तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.