शासनाच्या फसवणूक प्रकरणी तत्कालीन मुरुड सरपंच, ग्रामसेवकांवरही गुन्हा; गटविकास अधिकारी दिघे यांची दापोली पोलीस स्थानकात तक्रार
वार्ताहर : टाळसुरे
दापोली तालुक्यामधील मुरुड गावात इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कर आकारणीची कार्यवाही करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ताधारक माजी मंत्री, आमदार अनिल परब यांच्यासह तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुरुड ग्रामपंचायतीतील गट क्रमांक 446 मध्ये कोणतेही बांधकाम नसताना ग्रामपंचायतीमार्पत 2019 मध्ये बांधकामाच्या नोंदी घेऊन कर आकारणी केली असल्याबाबत चुकीच्या नोंदी घेतल्या आहेत, असा तक्रार अर्ज 16 सप्टेंबर 2021 रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दिला होता. त्यानुसार चौकशी केली असता मुरुड ग्रामपंचायतीच्या 29 जुलै 2019 मधील ठराव क्रमांक 6 (22) नुसार गट क्रमांक 446 मधील मिळकत क्रमांक 1074 वर प्रचलित नियमाच्या आधारे कर आकारणी करून ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 अभिलेखात नोंद घेतली आहे.
ही नोंद घेताना ग्रामपंचायतीने समक्ष जागेवर जाऊन इमारतीच्या पूर्णत्वाची खात्री करून कर आकारणी कार्यवाही करणे अपेक्षित होते, परंतु दस्तऐवजाची छाननी केली असता समक्ष जागेवर जाऊन कर आकारणीची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तसे कोणतेही पुरावे ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाहीत. तक्रारदार किरीट सोमय्या यांनी सादर केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तत्कालीन वेळचे 29 मार्च 2019 व 29 नोव्हेंबर 2020 रोजीचे गुगल अर्थ प्रोवरील छायाचित्र पाहिले असता या मिळकतीत कोणतेही बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कर आकारणी अंमलात आणली गेली आहे. इमारत पूर्ण होण्याआधीच आकारणी केलेल्या कराप्रमाणे 14 नोव्हेंबर 2019 रोजी कर वसुली करून त्याचे पुनर्विनियोजन केल्याचे दिसत नाही.
मुरुड ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 मधील कलम 124 नुसार प्राप्त अधिकारांचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केली आहे. तत्कालीन संबंधित मालमत्ताधारक अŸड. अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसतानाही मुरुड ग्रामपंचायतीला कर आकारणीबाबत अर्ज दिला आहे. तसेच उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड उपविभाग, दापोली यांना इमारत बांधकाम सुरू असून विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. यावरून इमारत पूर्ण नसतानाही ते पूर्ण असल्याचे भासवून मुरुड ग्रामपंचायतीची पर्यायाने शासनाची फसवणूक केली आहे. मुरुडचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक अनंत कोळी यांनी या इमारतीच्या अभिलेखात नोंदी घेताना समक्ष जागेवर जाऊन इमारतीच्या पूर्णत्वाची खात्री न करता नोंद करून कर आकारणी केल्याचे दिसत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. मुरुड ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 मधील कलम 124 नुसार प्राप्त अधिकारांचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक केली तसेच संबंधित तत्कालीन मालमत्ताधारक अŸड. अनिल परब यांनी त्यांच्या अर्जातील नमूद इमारत पूर्ण नसताना इमारत पूर्ण असल्याचे भासवून विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज करून मुरुड ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
हा तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर दापोली पोलीस स्थानकातील पथक मुरुड येथे दाखल झाले आहे. या प्रकरणी संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.