भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याचे दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयापुढे सांगितले. महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आणणाऱ्या ब्रिजभुषणसिंग य़ाच्याविरोधात कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत दिल्ली पोलीसांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तत्पुर्वी संशयित आरोपीची प्राथमिक चौकशी करणे महत्वाचे असल्याचेही म्हटले आहे.
यापुर्वी जानेवारी महिन्यात महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसले होते. सरकारने ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुस्तीगिरांनी आंदोलन मागे घेतले होते. पण त्यानंतर एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप पुन्हा एकदा कुस्तीपटूंनी करून एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरु करून ब्रिजभूषणच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ब्रिजभुषण सिंग याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने यावर सुनावणी घेतली. दिल्ली पोलीसांनी या सुनावणी दरम्यान आरोपींविरोधात एफआय़आर नोंदवणार असल्याचे सांगितले आहे.