384 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी चहापानापर्यंत बिनबाद 135 धावा
वृत्तसंस्था/ ओव्हल
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडवर विजय मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे आव्हान दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने रविवारी चहापानापर्यंत दुसऱ्या डावात बिनबाद 135 धावा जमवल्या आहेत. वॉर्नर आणि ख्वाजा यांनी अर्धशतके झळकवली. पावसाचा व्यत्यय आल्याने चहापान लवकर घेण्यात आले. चहापानानंतरही बराच वेळ खेळ सुरू झाला नव्हता.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळवली असून त्यांनी अॅशेस स्वत:कडे राखले आहे. चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यामुळे इंग्लंडची बरोबरी करण्याची संधी हुकली होती. या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावा जमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 295 धावा जमवत इंग्लंडवर 12 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. मात्र इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. त्यांच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकवली. क्रॉलेने 9 चौकारांसह 73, रुटने 1 षटकार आणि 11 चौकारांसह 91, बेअरस्टोने 11 चौकारांसह 78, डकेटने 7 चौकारांसह 42, कर्णधार स्टोक्सने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42, मोईन अलीने 4 चौकारांसह 29 धावा जमवल्या. चौथ्या दिवशी 81.5 षटकात इंग्लंडचा दुसरा डाव 395 डावात आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 4 गडी तर हॅझलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ब्रॉडचा शेवटचा षटकार
इंग्लंडने 9 बाद 389 या धावसंख्येवरून रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा शेवटचा फलंदाज 6 धावाची भर घालत तंबूत परतला. मर्फीने अँडरसनला 8 धावावर पायचित केले. इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 384 धावांचे आव्हान मिळाले. ब्रॉडने स्टार्कला षटकार ठोकत कारकिर्दीची सांगता केली. स्टार्कच्या पहिल्या पाच चेंडूवर एकही धाव निघाली नाही. मात्र शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने स्क्वेअरलेगच्या दिशेने षटकार ठोकला. पण पुढच्या षटकात मर्फीने अँडरसनला पायचीत करून इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. निवृत्ती जाहीर केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ब्रॉड मैदानात फलंदाजीस आला तेव्हा गार्ड ऑफ ऑनर देत त्याला मानवंदना दिली.
ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. वॉर्नर आणि ख्वाजा या सलामीच्या जोडीने उपाहारापर्यंत 24 षटकात 75 धावा जमवल्या. उपाहारावेळी वॉर्नर 30 तर ख्वाजा 39 धावावर खेळत होते. इंग्लंडच्या गोलंदाजांना या सत्रात यश मिळाले नाही. उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाचे शतक 194 चेंडूत नोंदवले गेले. या मालिकेतील त्यांची ही सर्वोत्तम सलामी ठरली. ख्वाजाने 110 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक तर वॉर्नरने 90 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पुर्ण केले. ऑस्ट्रेलियाने 38 षटकात बिनबाद 135 धावा जमवल्या असताना पावसामुळे पंचांनी खेळ थांबवला. यावेळी वॉर्नर 9 चौकारांसह 58 तर ख्वाजा 8 चौकारांसह 69 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्व बाद 283, ऑस्ट्रेलिया प. डाव 103.1 षटकात सर्वबाद 295, इंग्लंड दु. डाव 81.5 षटकात सर्वबाद 395 (क्रॉले 9 चौकारांसह 73, डकेट 7 चौकारांसह 42, स्टोक्स 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42, रुट 1 षटकार आणि 11 चौकारांसह 91, ब्रुक 1 षटकारासह 7, बेअरस्टो 11 चौकारांसह 78, मोईन अली 4 चौकारासह 29, अवांतर 7, स्टार्क 4-10, मर्फी 4-110, हॅझलवूड 1-67, कमिन्स 1-79), ऑस्ट्रेलिया दु. डाव 38 षटकात बिनबाद 135 (वॉर्नर 9 चौकारांसह खेळत आहे 58, ख्वाजा 8 चौकारांसह खेळत आहे 69, अवांतर 8).
(धावफलक चहापानापर्यंत)