चिपळुणातील मालघर-वाजेवाडी येथील घटना, -पतीसह सूनेनही केली मारहाण, तिघांवर गुन्हा
चिपळूण
वृध्द आईवर मुलाने कोयत्याने वार केला असून यात ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. इतकेच नव्हे तर पतीसह सूनेनेही तिला मारहाण केली. या तिघांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तराम वाजे, अजय दत्ताराम वाजे, अनघा अजय वाजे (सर्व वाजेवाडी-मालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद सुलोचना दत्ताराम वाजे (70, वाजेवाडी-मालघर) यांनी दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना वाजे यांचे पती दत्ताराम वाजे, मुलगा अजय वाजे व सून अनघा वाजे यांच्यात मालघर येथील नवीन घराच्या मालकी हक्कावरुन वाद आहेत. दत्ताराम, अजय व अनघा वाजे हे तिघेजण वडिलोपार्जित घरामध्ये राहतात व सुलोचना वाजे या घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरामध्ये राहतात. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सुलोचना या घरी जेवण करत असताना घराच्या दरवाजातून दत्तराम, अजय व अनघा वाजे या तिघांनी शिवीगाळ केली. तसेच घरामध्ये येऊन घराचा दरवाजा लावून घेत दत्ताराम याने सुलोचना यांना ओढत आणून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अजय यानेही हाताने मारहाण केली. यावेळी दत्ताराम याच्या कमरेला लावलेला कोयता अजय याने सुलोचना यांना मारल्याने त्याच्या उजव्या हाताच्या पंजाच्या पाठीमागील बाजूस दुखापत झाली आहे. तसेच अनघा हिनेही सुलोचना यांना शिवीगाळ केली. या प्र्रकारानंतर सुलोचना वाजे यांनी पती, मुलगा व सून याच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.