वार्ताहर /माशेल
सम्राट क्लब माशेलतर्फे ‘वारसा’ 19 वी मासिक सम्राट संगीत सभा नुकतीच खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात पार पडली. गोमंतकीय गायिका प्रचला आमोणकर यांची संकल्पना असलेल्या या संगीत सभेत त्यांच्या गुरु विदुषी मंगलाताई जोशी, पंडित कल्याण देशपांडे व गोमंतकीय हार्मोनियमवादक सुनाद राया कोरगावकर यांच्या रंगतदार मैफली झाल्या. संगीत सभेचे उद्घाटन सम्राट क्लब इंटरनॅशनलचे संचालक धर्मा चोडणकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राज्य 1 च्या अध्यक्ष भाग्यरेखा गांवस, खांडोळा महाविद्यालयाचा उपप्राचार्य डॉ. आशा गेहलोत, प्रचला आमोणकर, माशेल सम्राटच्या अध्यक्ष अनिता रायकर, खजिनदार मंगेश गावकर आदी उपस्थित होते. धर्मा चोडणकर यांनी ‘वारसा’ या संकल्पनेची विशेष प्रशंसा करून सम्राट क्लबने कला व संस्कृतीला नेहमीच प्राधान्य दिल्याचे सांगितले. अनिता रायकर यांनी स्वागत केले. त्यानंतर मंगलाताई जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग बरवा आणि मारुबिहाग सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर यांनी तर हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर यांनी साथसंगत केली. कल्याण देशपांडे यांनी तबला एकलवादन सादर केले. त्यांनी तीनताल व अन्य प्रकार सादर केले. आकाश जल्मी यांनी त्यांना नगमा साथ केली. सोनाद कोरगावकर यांनी हार्मोनियमवर राग मधुवंती सादर केला. त्यांना मिलिंद परब यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मीता आमोणकर यांनी केले. महाशाला कला संगम, खांडोळा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना व पालक शिक्षक संघाच्या सहकार्याने या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.