चित्र घरात आणल्यावर होऊ लागले मृत्यू
एखादे चित्र अनेक दुर्घटनांना जबाबदार ठरू शकते असा विचार कधी केला आहात का? सोशल मीडियावर ‘द क्राइंग बॉय’ नावाचे एक चित्र व्हायरल होत आहे. हे चित्र घरात लावल्यास कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यू होतो किंवा घरातील कुटुंब उद्ध्वस्त होते असे बोलले जात आहे. हे चित्र इटलीचे प्रसिद्ध चित्रकार जियोवनी ब्रागोलिन यांनी 1985 मध्ये काढले होते.
जियोवनी ब्रागोलिन यांनी 1985 मध्ये एका रडणाऱया मुलाचे चित्र काढले होते. या चित्राला मोठी प्रसिद्धी मिळाल्याने त्याच्या 50 हजार प्रती तयार करण्यात आल्या. काळासोबत ब्रागोलिन यांना या चित्राने अत्यंत प्रसिद्धी मिळवून दिली, परंतु याचबरोबर चित्रामुळे बदनामी देखील पदरी पडली.
चित्र सुखरुप, घर जळाले
ज्या लोकांनी या चित्राची खरेदी करून स्वतःच्या घराच्या भिंतीवर ते टांगले, त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जाते. इटलीच्या अनेक अग्निशमन कर्मचाऱयांनी याचा खुलासा केला होता. सुमारे 15 घरांमध्ये आग विझविण्यासाठी आपण टीमसोबत गेलो, ज्या घरात आग विझविण्यासाठी जायचो, तेथे द क्राइंग बॉयचे चित्र मिळायचे. घरातील सर्व सामग्री जळून खाक व्हायची परंतु चित्र सुस्थितीत मिळायचे असे त्यांचे म्हणणे हेत.
चित्र ठेवणे बंद दुर्घटनेच्या बातम्या येऊ लागताच लोकांनी हे चित्र घरांमध्ये ठेवणे बंद केले. नंतर चित्राच्या हजारो प्रती जाळून टाकण्यात आल्या. त्यानंतर दुर्घटनांचे प्रमाणही कमी होऊ लागले. मग लोकांनी चित्र खरोखरच शापित होते असे मानले. सरे येथील एका महिलेने चित्राची खरेदी केल्याच्या 6 महिन्यांनी घरात आग लागल्याचा दावा केला. तर किलबर्नमध्ये दोन बहिणींनी चित्राची एक प्रत खरेदी केल्यावर स्वतःच्या घराला पेटवून दिले. नॉटिंगहॅममध्ये एका पिझ्झा पार्लरमध्ये आग लागली, यात भिंतींवरील सर्व चित्रे जळून नष्ट झाली, परंतु द क्राइंग बॉयचे चित्र सहिसलामत होते.