चार जनावरे, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
कोकरूड/वार्ताहर
खुजगाव ता. शिराळा येथे विद्युत वितरणच्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत, जनावरांची १३ शेड, चार जनावरे, शेती व संसारोपयोगी साहित्य मिळून २० लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जनावर जखमी झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खुजगाव येथील विद्युत वितरणच्या डीपी मध्ये दुपारी ५.३० वाजता शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये पांडुरंग बंडू सावंत, तुकाराम दादू सावंत, आनंदा दादू सावंत, शामराव नामदेव सावंत, संतोष शंकर सावंत, गुंडा तुकाराम सावंत, बाळकु यशवंत सावंत, दगडू यशवंत सावंत, निवृत्ती ज्ञानदेव सावंत, अशोक दगडू सावंत, संजय दगडू सावंत, पांडुरंग दगडू सावंत, संभाजी यशवंत सावंत यांच्या जनावरांच्या तेरा शेडांना आग लागली. प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांनी ३० जनावरांना सुखरूप बाहेर काढले मात्र शामराव नामदेव सावंत यांच्या ३ म्हैशी, १ रेडकू होरपळून मृत्यू पडले तर एक रेडकू जखमी झाले आहे.
डोळ्यासमोर लागलेली आग पाहून विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या निवृत्ती ज्ञानदेव सावंत यांना आगीची झळ बसली. ही आग एवढी भयानक होती की, विश्वास साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत राख रांगोळी झाली होती. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे भात, मका असे धान्य, शेत उपयोगी अवजारे, घरगुती साहित्य, पिंजर, गवत, लाकडे जळून खाक रपोता झाले. तर आगीत सर्व शेतकऱ्यांचे मिळून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या अगोदरही या डीपी मध्ये शॉर्टसर्किट होऊन दोन वेळा आग लागण्याची घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत वितरणाची डीपी दुसरीकडे हलवण्याची मागणी केली होती. मात्र विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने, ही घटना घडली असून या नुकसानीस विद्युत वितरण जबाबदार असल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी तलाठी मंदार पाटील, मंडल अधिकारी विठ्ठल पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी कृष्णा माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली.