40 किमीचा पाठलाग करून एसएटीफकडून एन्काउंटर
वृत्तसंस्था/ अयोध्या
उत्तरप्रदेशच्या अयोध्येत धावत्या रेल्वेत महिला पोलिसाशी क्रौर्य करणारा आरोपी अनिशला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. तर चकमकीत दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन पोलीस जखमी झाले आहेत. ही चकमक अयोध्येतील पूराकलंदर भागात घडली आहे.
आरोपी इनायतनगर येथे लपून बसल्याची माहिती एसटीएफला शुक्रवारी पहाटे मिळाली होती. या इनपूटनंतर एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. परिसराला घेरून आरोपींचा शोध घेतला जात होता. याचा सुगावा लागताच अनिश, विश्वंभर आणि आझाद या तिन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विश्वंभर आणि आझाद हे जखमी झाले आहेत.
याचदरम्यान अंधाराचा लाभ घेत अनिश तेथून बाइकद्वारे पळाला. एसटीएफने सुमारे 40 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. पोलिसांनी त्याला शरणागती पत्करण्याचे आवाहन केले, परंतु अनिशने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनिश मारला गेला. या चकमकीत पोलीस अधिकारी रतन शर्मा जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनिश खान हा महिला कॉन्स्टेबलवरील हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी होता. 31 ऑगस्ट रोजी महिला कॉन्स्टेबले शरयू एक्स्प्रेसमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आली होती. तसेच महिला कॉन्स्टेबलच्या शरीरावर कपडे नव्हते, चेहऱ्यावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. महिला कॉन्स्टेबलसोबत झालेले क्रौर्य पाहून पोलीस अधिकाऱ्यांना धक्का बसला होता.
या घटनेला 23 दिवस उलटू गेल्यावर महिला कॉन्स्टेबलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली होती. याचमुळे या प्रकरणाचा तपास एसटीएफला सोपविण्यात आला होता. एसटीएफने 5 दिवसांपूर्वी याप्रकरणी जनतेला माहिती पुरविण्याचे आवाहन केले होते.