रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील : आता 8 तासांत बेंगळूर : ‘तरुण भारत’चे वृत्त ठरले खरे
बेळगाव : रेल्वे मंत्रालयाने बेळगावकरांना दिवाळीनिमित्त खास भेट दिली आहे. आता काही दिवसांतच बेळगावमधून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून अवघ्या 8 तास 10 मिनिटांमध्ये बेळगावहून बेंगळूरला वंदे भारतचा आलिशान प्रवास करता येईल. ‘तरुण भारत’ने वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार हे दिलेले वृत्त खरे ठरले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसद्वारे बेळगावलाही कनेक्टिव्हिटी द्यावी, या मागणीसाठी निवेदने देण्यात आली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी तसेच कर्नाटकचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी रेल्वे बोर्डकडे वंदे भारत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही 1 नोव्हेंबर रोजी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून बेळगावला वंदे भारत सुरू करण्याची मागणी केली होती. या सर्वांची दखल घेऊन नागरिकांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार आहे. रेल्वे क्रमांक 20661 वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे 5.45 वाजता बेंगळूर येथून निघणार असून दुपारी 1.30 वाजता बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक 20662 वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 2 वाजता बेळगावमधून निघणार असून रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी बेंगळूरला पोहोचेल. नैर्त्रुत्य रेल्वेने मंगळवारी रात्री प्रसिद्धीपत्रक काढून बेळगावला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत असल्याचे जाहीर केले.
बेळगावकरांना वंदे भारतचा सुसाट प्रवास करता येणार
सर्वच राजकीय व्यक्तींकडून वंदे भारत एक्स्प्रेससाठी प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याच्या हालचाली असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने 4 नोव्हेंबरच्या अंकात दिले होते. दि. 7 अथवा 8 नोव्हेंबर रोजी वंदे भारतसाठी चाचणी घेण्याची शक्यताही वर्तविली होती. हे वृत्त आता खरे ठरले असून लवकरच बेळगावकरांना वंदे भारतचा सुसाट प्रवास करता येणार आहे.
वंदे भारतचे वेळापत्रक…
- पहाटे 5.45 वा. बेंगळूरहून निघणार
- दुपारी 1.30 वा. बेळगावला पोहोचणार
- दुपारी 2.00 वा. बेळगावहून निघणार
- रात्री 10.10 वा. बेंगळूरला पोहोचणार