पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी : 16 अटल निवासी शाळांचेही उद्घाटन
वृत्तसंस्था/ वाराणसी
लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले असून याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एक दिवसीय दौऱ्यावर वाराणसीला पोहोचले. त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करत अनेक योजनांची घोषणाही केली. काशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यासोबतच त्यांनी 16 अटल निवासी शाळांचे उद्घाटनही केले. क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी हे देखील उपस्थित होते. विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी शनिवारी वाराणसीला पोहोचल्यानंतर विमानतळावर सर्वसामान्य महिलांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते उघड्या जीपमध्ये बसून जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी गांजरी येथे पोहोचले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी त्यांनी शिवधामच्या आकारात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे भूमिपूजन केले. पीएम मोदींनी आपल्या भाषणाची सुऊवात ‘हर हर महादेव’ने केली. पुढील वषी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा वाराणसी दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. काशीमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटनासोबतच, पंतप्रधानांनी ऊद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कन्व्हेन्शन सेंटर आणि काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या समारोप समारंभातही भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. या कार्यक्रमांमधून जनतेचा दोन्ही नेत्यांना भरपूर पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.
युवा क्रीडापटूंना संधी देण्याची गरज
क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करताना पीएम मोदी म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात क्रीडा संस्कृती बदलली असून खेळाडूंच्या कामगिरीत ऐतिहासिक सुधारणा झाली आहे. आज खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. या बदलत्या स्थितीत युवा क्रीडापटूंना अधिकाधिक संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या सरकारने क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवला आणि निवडीत पारदर्शकता आणली, असेही पंतप्रधान म्हणाले. क्रिकेट स्टेडियमचे कौतुक करताना त्यांनी काशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.
महिला आरक्षण विधेयक ही मोठी उपलब्धी
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयकावरही भाष्य केले. ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’मुळे देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या संकल्पाला आणि ताकदीला यामुळे नवी उंची मिळेल, असे ते म्हणाले. आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. यात महिलांचा सहभाग मोठा असून त्यांना आणखी पाठबळ देण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
काशी हे दुसरे ‘शिवशक्ती’चे ठिकाण
युवा वर्गाच्या क्रीडा-कलागुणांना वाव देण्यासाठी हे स्टेडियम उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. येथे एकाच वेळी 30 हजार लोकांना सामना पाहता येणार आहे. चांद्रयान-3 शिवशक्ती बिंदूवर पोहोचल्याला एक महिना पूर्ण होत असताना आज मी काशीत आलो आहे, असे मोदी म्हणाले. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे आणि दुसरे शिवशक्तीचे स्थान काशी असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात क्रिकेट सामन्यांसाठी महत्त्वाच्या मैदानांची गरज पूर्ण करण्यासाठी पूर्वांचलचे हे क्रिकेट स्टेडियम काम करेल, असे पंतप्रधान म्हणाले.