प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे काल अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. अनेक ठिकाणी लेझीम पथके तसेच दिंडींच्या स्वऊपात मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोव्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून अनेक गावातूनही सार्वजनिक गणेशाचे पूजन करण्यात येते. सकाळच्या सत्रात पूजाअर्चा व इतर विधी झाल्यानंतर दुपारी आरती कऊन भजने सादर करून या सार्वजनिक मूर्ती सायंकाळी विसर्जनासाठी मंडपातून बाहेर काढण्यात आल्या. गीत, संगीत, ढोल-ताशा तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणुकीने मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. अनंत चतुर्दशीचे व्रत व इतर कार्यक्रम काल गुऊवारी उत्साहाने पार पडले.
राजधानी पणजीतील पणजीकर सार्वजनिक गणेशमूर्ती, माऊतीगड मळा – पणजी येथील मूर्ती तसेच राखीव पोलीस दलाच्या (आल्तीनो) येथील गणेशमूर्तीचे आज शुक्रवारी विसर्जन होणार असल्याचे सांगण्यात आले. सांताक्रूझ येथील सार्वजनिक गणेशाचे काल रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. अधूनमधून पावसाने हजेरी लावली असली तरी विसर्जनासाठी गणेशभक्तांनी चांगला उत्साह दाखवला. राज्यातील गेले अनेक दिवस चालू असलेला घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आज संपुष्टात येईल. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणांनी गणेशाला निरोप देण्यात आला.