बिडेन प्रशासनाकडून नेदरलँडमधील राजदूत नियुक्त
@ वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतील जो बिडेन प्रशासनाकडून शेफाली राजदान दुग्गल यांची नेदरलँडमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेफाली दुग्गल या भारतीय वंशाच्या काश्मिरी पंडित आहेत. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी शेफाली यांना पदाची शपथ दिली आहे.
मार्च महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनी शेफाली यांचे नाव नेदरलँडमधील राजदूतपदासाठी सुचविले होते. त्यानंतर अमेरिकेच्या संसदेत पुढील राजदूतासाठी आवाजी मतदानाने दुग्गल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 50 वर्षीय शेफाली दुग्गल या अनुभवी राजकीय कार्यकर्त्या आहेत. महिला आणि मानवाधिकारांसाठी त्या कार्यरत राहिल्या आहेत.
शेफाली दुग्गल यांनी 2020 मध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या नॅशनल कॉन्व्हेंशनमध्ये क्रेडेंशियल स्थायी समितीचे उपाध्यक्षपद भूषविले होते. याचबरोबर त्यांनी 2016 मध्ये पक्षाच्या नॅशनल कॉन्व्हेंशनमध्ये रुल्स कमिटीचे सदस्य म्हणून काम केले होते. राजदान यांनी डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीत राष्ट्रीय आर्थिक समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
शेफाली राजदान दुग्गल या काश्मिरी हिंदू आहेत. सिनसिनाटी, न्यूयॉर्क, शिकागो आणि बोस्टनमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले आहेत. मियामी विद्यापीठातून त्यांनी पदवी तर न्यूयॉर्क विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस देखील भारतीय वंशाच्या आहेत. कमला यांच्या आई श्यामला गोपालन यांचा जन्म भारतात झाला होता.