युएईच्या वाळवंटातील सर्वात धोकादायक शिकारी
संयुक्त अरब अमिरात हा वाळवंटी असूनही जगातील सर्वात सुंदर शहरे असणारा देश आहे. युएईमध्ये पर्यटकांसाठी रोमांचची कमतरता नसते. काही पर्यटक रात्रीच्या अंधारात युएईच्या वाळवंटात डेझर्ट कॅम्पिंग करण्यासाठी येतात. दिवसा अंग भाजून काढणाऱया उष्णतेनंतर वाळवंटात रात्री 5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खालावते. डेझर्ट कॅम्पिंगमध्ये लोक वाळवंटात शेकोटी पेटवून मौजमस्ती करत रात्र घालवतात. परंतु याच वाळवंटामधून काही अत्यंत धोकादायक शिकारी अंधारात स्वतःच्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडत असतात. युएईत डेझर्ट कॅम्पिंगची इच्छा असल्यास तेथील धोकादायक साप आणि विंचवांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
वाळवंटात डेथस्टाकर विंचू हा धोकादायक मानला जातो. हा अत्यंत छोटा, पिवळय़ा रंगाचा आणि अत्यंत विषारी असतो. रास अल खैमाह आणि उम्म अल-क्वैनमध्ये लोकांना सापांच्या विविध प्रजातींपासून सावध राहण्याची गरज असते. विशेषकरून हॉर्नड वायपरबद्दल. या सापांना शिंगे असतात. युएईत सापांच्या 13 स्थानिक प्रजाती आढळतात, परंतु वायपरच्या काही प्रजापींपासून सर्वात अधिक सावध राहण्याची गरज असते.
अरेबियन हॉर्नड वायपरला ‘सँड वायपर’ देखील म्हटले जाते. हा साप प्रामुख्याने वाळवंटी भागात आणि कमी पाऊस पडणाऱया भागात आढळतो. सिंध सॉ-स्केल्ड वायपर हा अबुधाबी आणि रास अल-खैमाहच्या वाळवंटी भागांमध्ये आढळून येतो. पर्शियन हॉर्नड वायपर हा हजार पर्वतांमध्ये आढळतो. शिंगयुक्त साप स्वतःच्या दातांनी भक्ष्यात विष इंजेक्ट करत असतो. हे विषामुळे रक्ताच्या गुठळय़ा तयार होतात.