वयाच्या 9 व्या वर्षी ग्रॅज्युएट
अमेरिकेच्या पेन्सिल्वेनियामध्ये 9 वर्षीय मुलाने कमाल केली आहे. 9 वर्षीय मुलगा हायस्कूलमध्ये सर्वात कमी वयाचा ग्रॅज्युएट ठरला आहे. याचबरोबर त्याने महाविद्यालयीन पदवीसाठी क्रेडिट मिळविणे सुरू केले आहे. या मुलाचे नाव डेव्हिड बालोगुन असून त्याने दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून हॅरिसबर्गध्ये रीच सायबर चार्ट स्कूलमधून स्वतःचा डिप्लोमा प्राप्त केला आहे.
डेव्हिड स्वतःच्या कामगिरीचे श्रेय अनेक पसंतीचे शिक्षक आणि विज्ञान तसेच कॉम्प्युटर प्रोग्रामिंगबद्दलच्या स्वतःच्या प्रेमाला देतो. खगोलशास्त्रज्ञ होण्याची माझी इच्छा असून कृष्णविवर आणि सुपरनोव्हाचे अध्ययन करू इच्छित असल्याचे डेव्हिडने एका मुलाखतीत सांगितले आहे.
डेव्हिडचे आईवडिल उच्चशिक्षित आहेत, परंतु अशाप्रकारची विलक्षण बुद्धीमत्ता असलेल्या मुलाचे पालनपोषण करणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डेव्हिड केवळ 9 वर्षांचा आहे, अनेक गोष्टी समजून घेण्याची बुद्धीमत्ता त्याच्याकडे आहे. वयापेक्षा तो खूपच हुशार असून कधीकधी मलाही माहित नसलेल्या गोष्टी त्याला ठाऊक असतात असे त्याची आई रोन्या बालोगुन यांनी म्हटले आहे.
असामान्य स्वरुपात प्रतिभाशाली विद्यार्थ्याकडून आम्हीच ज्ञान प्राप्त केले आहे. डेव्हिड एक प्रेरणादायी विद्यार्थी असून निश्चितपणे तो तुमचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन बदलून टाकतो असे त्याचे विज्ञानाचे शिक्षक कोडी डेर म्हणाले. डेव्हिड हा मेन्सा हाय इंटेलिजेन्स सोसायटीचा सदस्य देखील आहे. रीच चार्टर स्कूलमधून ग्रॅज्युएट झाल्यावर एका सत्रासाठी त्याने बक्स काउंटी कम्युनिटी कॉलेजमध्ये भाग घेतला आहे. शिक्षणासोबत डेव्हिड मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त करण्याची तयारी करत आहे.