वनविभागाने सुरक्षितरित्या सुटका करून दिले जीवदान
मंडणगड प्रतिनिधी
तालुक्यातील देव्हारे गावाच्या हद्दीत खासगी मालकीच्या क्षेत्रात देव्हारे-आतले रस्त्यानजीक फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची वनविभागाने सुरक्षितरित्या सुटका करून त्यास जीवदान दिले.
बुधवारी घडलेल्या या घटनाक्रमाबात दापोली परिक्षेत्रपाल वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातील माहितीनुसार, मंडणगड तालुक्याचे वनपाल अनिल दळवी यांना सायंकाळी 4.30 वाजता देव्हारे येथील नागरिक श्रीधर खैर यांनी देव्हारे-आतले रस्त्यालगत काजू बागायतीत फासकीत बिबटय़ा अडकल्याची माहिती दिली. त्यामुळे मंडणगड वनपाल व देव्हारे वनरक्षक यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता देव्हारे-आतले रस्त्यालगत काजू बागायतीत 2 वर्षाचा नर जातीचा बिबटय़ा फासकीच्या तारेत अडकल्याचे दिसले. त्यामुळे वनपाल दळवी यांनी या बाबत परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, दापोली व खेड वनपाल यांना सूचीत केले. त्यानुसार खेड वनपालांनी तत्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्य घेवून ते घटनास्थळी दाखले झाले. वन्यप्राणी बचाव पथकाने लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबटय़ास सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजऱयासह बिबटय़ास खासगी वाहनांमध्ये घेवून मंडणगडला आणून पशुधन विकास अधिकाऱयांकडून बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात आली. त्यावेळी बिबटय़ा नैसगिक अधिवासात सोडण्यास सुस्थितीत असल्याने त्यास नैसर्गीक अधिवासात मुक्त करण्यात आले. या प्रकरणी मंडणगड वनपाल यांनी अज्ञात व्यर्क्तींविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला असून गुह्याचा पुढील तपास दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे करीत आहेत. वनविभागाने केलेली कारवाई रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, रत्नागिरी सहाय्यक वनरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, मंडणगड वनपाल अनिल दळवी, खेड वनपाल सुरेश उपरे, दापोली वनपाल सा. स. सावंत तसेच देव्हारे व पालघर वनरक्षक यांनी पार पाडली.