एका विमानाच्या लँडिंगवेळीच दुसऱ्या विमानाला उड्डाणाची परवानगी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. विस्तारा एअरलाईन्सच्या एका विमानाला उ ड्डाणाची परवानगी देण्यात आली असताना दुसरे विमान उतरण्याच्या प्रक्रियेत होते. एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आले.
युके 725 या नव्याने उद्घाटन झालेल्या धावपट्टीवरून दिल्लीहून बागडोगराकडे जाणारे विमान उड्डाण करत होते. याचदरम्यान अहमदाबादहून दिल्लीला जाणारे विस्तारा हे विमान समांतर धावपट्टीवर उतरल्यानंतर धावपट्टीच्या शेवटच्या दिशेने जात होते. दोघांनाही एकाच वेळी सिग्नल देण्यात आल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एटीसीला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) यासंबंधी धोका लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याने तत्काळ विस्तारा एअरलाईन्सच्या पायलटला सतर्क केल्याने मोठी दुर्घटना टळली. विमान योग्य वेळी थांबवले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, टेक-ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही विमान किंवा वाहनांच्या हालचालींना परवानगी दिली जात नाही. विमान दुसऱ्या धावपट्टीवर उतरेपर्यंत एका धावपट्टीवर विमानाला टेक ऑफ क्लिअरन्स दिले जात नाही. मात्र, बुधवारी येथे ‘एटीसी’ला पुढील धोका योग्य वेळी लक्षात आल्याने मोठा अपघात टळला.